पुणे जिल्हा : चाकण होणार अखंडित वीजपुरवठा ; औद्योगिक वसाहतीत दोन उपकेंद्र कार्यान्वित

चाकण – औद्योगिक वसाहतीत जाणवणार्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर महावितरणने तोडगा काढला असून यासाठी 15.49 कोटी खर्चाची दोन उपकेंद्र कार्यान्वित केली आहेत. यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने सातत्याने पाठपुरावा केला होता.
दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्यामुळे 7 हजार 783 औद्योगिकसह, 88 हजार 084 घरगुती व वाणिज्यिक 9549 ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या परिसरातील ज्या फीडरवर अधिक क्षमतेने मागणी आहे, त्यावरील वीज मागणीची विभागणी करण्यात येणार आहे. याशिवाय अस्तित्वातील फीडरची क्षमताही वाढणार आहे.
या उपकेंद्रामुळे चाकण व औद्योगिक वसाहत परिसरात अखंडित वीज पुरवठा होईल. अखंडित वीज पुरवठा व्हावा या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्याधिकारी (सीएमओ) संजीव कुमार यांनी पुणे ग्रामीण विभागाशी समन्वय साधून तात्काळ चाकण औद्योगिक वसाहत व परिसरासाठी पाचशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली. त्याअंतर्गत एमआयडीसी परिसरातील अधिकाधिक सुधारणांसाठी अनेक कामे राबविण्यात येणार आहेत. याशिवाय येत्या दोन महिन्यांत आणखी एक नवीन उपकेंद्र ही सुरू होणार आहे.
विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील किंग्फा 22/22 केव्ही, व ह्युंदाई 22/22 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. या परिसरातील अनेक फिडरची तांत्रिक स्वच्छता केली जाणार आहे. या प्रस्तावित कामांमुळे भविष्यात उद्योग, व्यवसाय व घरगुती वीज पुरवठा सलग सातत्याने होईल असा विश्वास विद्युत विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
वीज चोरी व थकबाकी या समस्येवर पर्याय म्हणून येत्या काही दिवसांत वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर पुरविले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. उपकेंद्र उद घाटन कार्यक्रमासाठी पुणे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज सचिव दिलीप बटवाल, अधीक्षक अभियंता जरग, खेडचे कार्यकारी अभियंता एडके व उपकार्यकारी अभियंता गारगोटे व औद्योगिक वसाहतीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
खेड (राजगुरुनगर) वीज वितरण विभागाची विस्तृत व्याप्ती लक्षात घेऊन या परिसराचे दोन विभाग करून उद्योगांसाठी वेगळा विभाग सुरू करण्यात येणार आहे.
-राजेंद्र पवार, मुख्य अभियंता महावितरण





