पुणे जिल्हा : जातीय फॅक्टर की विकासावर भर?

इंदापूर: इंदापुरात जातीय समीकरणं कधी प्रभावी ठरतात तर कधी नाही; मात्र यावेळी ही निवडणूक जातीय राजकारणापेक्षा विकासकामांवर आणिध आरोप प्रत्यारोपांवर लढवली जात आहे.
हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांकडेही त्यांची स्वतःची व्होटबँक आहे आणि ती कायम ठेवून इतर लोकांची मतं कशी मिळतील या प्रयत्नात ते आहेत. जातीय राजकारण पाहिले तर या निवडणुकीत दत्तात्रय भरणेंचं पारडं जड दिसते. याचे कारण म्हणजे यापूर्वीही व आता धनगर समाज त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहत आसल्याचे वेळावेळी दिसले आहे. तसेच माळी समाजाचासुद्धा त्यांच्याच बाजूने कल असल्याचं सांगितलं जातं. शिवाय अजित पवारांमुळे काही प्रमाणात मराठा समाज देखील त्यांच्याकडे आहे.
जरांगे फॅक्टरचा फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो, अशी शक्यता आहे. शरद पवारांमुळे मुस्लीम समाजाचेही एकगठ्ठा मतदान हर्षवर्धन पाटलांना होईल. मागासवर्गीय समाजाचेही बर्यापैकी मतदान होईल; परंतु वंजारी समाजाची काही गावं आहेत जसे की लाकडी, निंबोडी,
अकोले, लाखेवाडी ही मोठ्या संख्येने ओबीसी फॅक्टर म्हणून कोणाकडे जाता यावरही बरीच गणिते फिरू शकतात. त्यात दोन मराठा उमेदवारांमुळे मराठा समाज विखुरला जाणार का हेी पाहावे लागले. असे असले तरीही शरद पवार यांच्यामागचे भावनिक राजकारण आणि प्रचाराची होणारी त्यांची सांगता सभा इंदापुरात होत आहे.
त्यामुळे शेवटच्या क्षणाला, हर्षवर्धन पाटलांचं पारडं जड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी मतदार कोणत्या प्रश्नावर कोणाच्या पारड्यात आपल्या मताचे दान करतो हे येत्या रविारी कळेलच.





