Pune Distric: कारखान्यातून 4 लाख 70 हजार रुपयांची रोकड चोरी

वाघोली : अष्टापूर भागात एका कारखान्यातून 4 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कारखान्याचे मालक अख्तर मोहम्मद सादीर खान (वय 42, रा. अष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शानू जियाउद्दीन (वय 27, रा. व्हिक्टोरिया गंज, हरदोई, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खान यांचा अष्टापूर गावात सिमेंटपासून छोटे पाईप तयार करण्याचा कारखाना आहे.
आरोपीत शानू त्यांच्या कारखान्यात कामाला आहे. 21 मार्च रोजी ते दुपारी खान हे प्रसाधनगृहात गेले होते. कारखान्यातील 4 लाख 70 हजारांची रोकड त्यांनी पेटीत ठेवली होती. खान तेथे नसल्याची संधी साधून आरोपीत शानूने पेटी उचकटून रोकड चोरली. रोकड चोरुन तो पसार झाला. रात्री उशीरा खान यांच्या लक्षात हा प्रकार आला.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शान उत्तर प्रदेशात पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.





