पुणे जिल्हा : बारामतीत तीन दिवसांनर अखेर कार ताब्यात

पोलिसांकडून सुरू होता शोध : खटल दाखाल करीत दंडात्मक कारवाई
बारामती – शहरात तीन दिवसांपासून काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने भरकटणारी एक संशयित कार (एमएच 06 एझेड 8555) चा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला आहे. तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही कार ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली आहे.
कृष्णा अभिजीत क्षीरसागर (रा. माऊली नगर प्रगती नगर रोड बारामती) असे कारवाई करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर 24 मे रोजी कारवाई करत होते. याचवेळी भिगवण चौकातून काळया काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक कार भरधाव वेगाने जाताना दिसली.
पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती कार थांबली नाही आणि वेगाने निघून गेली. यानंतर ती कार सिटी इन चौकात थांबवण्यासाठी वाहतूक पोलीस स्वाती काजळे यांना कळविले. काजळे यांनीही सिटी इन चौकात कार अडवण्याचा प्रयत्न केला, पण वाहनाने पुन्हा भरधाव वेग घेतला. पुढे, दि.28 मे रोजी तीच कार गांधी चौकात वाहतूक पोलीस सीमा घुले आणि रुपाली जमदाडे यांना दिसली, मात्र त्या वेळीही ती थांबवता आली नाही
. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान सुधाकर जाधव आणि अजिंक्य कदम यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच परिसरातील नागरिकांची विचारपूस करून संबंधित वाहनाविषयी सविस्तर माहिती मिळवली. अखेर बारामती शहरातच ती कार शोधून काढण्यात आली आणि पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या वाहतूक पथकाने केली.
कार घेतली ताब्यात
वाहनावर काळ्या काचा, नंबर प्लेट नव्हती, विमा नव्हता यामुळे वाहनचालकावर 3500 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, बेदारकारपणे वाहन चालवणे याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. कारच्या काळ्या काचा कमी करण्यात आल्या असून खूप मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम सुद्धा काढण्यात आलेली आहे. सध्या ही कार गाडी बारामती वाहतूक शाखा या ठिकाणी ताब्यात घेण्यात आली.





