खेडशिवापूर : माथेफिरू पीएमपीएमएलच्या बस चालकाने गिर जातीच्या गाईंच्या कळपाला चिरडले. या अपघातात तीन गायी दगावल्या असून, इतर गंभीर असलेल्या तीन गायी दगावण्याच्या मार्गावर आहेत. तर, आठ गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. यावेळी सकाळी सात वाजता पीएमपीएमएल प्रशासनास कळवूनही ते अधिकारी साडेअकरा वाजता पोलीस स्टेशनला हजर झाले. या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर शिवसेनेने सुरू केलेले आंदोलन मागे घेतले. सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी कोंढणपूर रस्त्यावरील सागराची ताल याठिकाणी गीर गाईचा कळप हा चरण्यासाठी रानात निघाल्या होत्या. त्याक्षणी कोंढणपूर ते अवसरवाडी ही पीएमपीएमएल बस कोंढणपूर येथून शुक्रवारी सकाळी पावणे सात वाजता पुण्याकडे जायला निघाली असताना साधारण एक किलोमीटरच्या अंतरावर भरधाव बसने अक्षरशः कळपात घुसून गाईंना चिरडले. यामध्ये तीन गाई दगावल्या असून इतर गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. काहींचे पाय मोडले आहेत, तर काहींचे पायाचे पंजे तुटून पडले आहेत. एका गायीचे शिंग तुटलेले दिसून आले. घटनास्थळी राजगड पोलीस ठाण्याचे पप्पू शिंदे व नवनाथ राठोड पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून रमेश कोंडे, दीपक राजपूत, कैलास कांबळे, राजेंद्र दिघे, संदीप मुजुमले, राजू सट्टे व भागातील कार्यकर्त्यांनी कोंढणपूर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर राजगड ते पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पीएमटी अधिकारी वर्गाशी संपर्क साधून लेखी आश्वासन घेतले व त्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन स्थगित केले.