Pune District : पोंदेवाडी येथे श्री गडदादेवी यात्रोत्सवानिमित्त उद्या बैलगाडा शर्यत

मंचर : पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री गडदादेवी यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवार, दि. १४ रोजी बैलगाडा शर्यती व शनिवार, दि.१५ रोजी कुस्त्यांचा आखाडा यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.
श्री गडजादेवी यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी सात ते दहा देवीला हारतुरे व महापूजा, सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत बैलगाड्याच्या भव्य शर्यती, नऊ वाजेनंतर तुकाराम महाराज खेडकर यांच्यासह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा संपन्न होणार आहे. शनिवार, दि. १५ रोजी सकाळी नऊ वाजता देवीला चोळी पातळ, शेरनी वाटप, काठीची मिरवणूक व चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. कुस्त्यांसाठी ७००१ रुपये,५००१ रुपये, ३००१ रुपये, ११११ रुपये, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी संपन्न होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी एकूण १ लाख ६६ हजार १०१ रुपये इनाम ठेवण्यात आला आहे.
प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाड्यास ५१ हजार १११ रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकास ४१ हजार १११ रुपये ट्रॉफी, तृतीय क्रमांकास ३१ हजार १११ रुपयांची ट्रॉफी, अशी बक्षिसे असून प्रथम फायनल गाड्यास १० हजार ००१ रुपये ट्रॉफी, द्वितीय फायनल गाड्यास ७ हजार रुपये ट्रॉफी, तृतीय फायनल गाड्यास ५ हजार १ रुपये ट्रॉफी, चतुर्थ फायनल गाड्यास ३ हजार १ रुपये ट्रॉफी, असे बक्षीस देण्यात येणार आहे.
तसेच घोड्याच्या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी १००१ रुपये, द्वितीय क्रमांक ७०१ रुपये व चतुर्थ क्रमांक ५०१ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दोन दिवशीय यात्रा उत्सवासाठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यासह आंबेगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेला उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ पोंदेवाडी, रोडेवाडी यांनी केले आहे.





