Pune District : नीरेत बैलांची सवाद्य मिरवणूक; घरोघरी पूजन

नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा परिसरातील खेडेगावात बुधवारी (दि. 9) आषाढ महिन्यातील पारंपरिक देशी बेंदुर (बैलपोळा) उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकर्यांनी आपल्या सर्जा-राजाची सजावट करून गावोगावी मिरवणुका काढल्या. प्रसिद्ध बैलगाडा मालक स्व. भागूजी दगडे पाटील यांच्या घरासमोर घरातील महिलांनी बैलांचे पुजन करुन सहवाद्या नीरा शहरातून मिरवणूक करण्यात आले.
नीरा बाजारपेठेत बुधवारी सकाळी शेतकर्यांनी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. ज्या शेतकर्यांकडे बैलजोडी नाही ते मातीची बैलजोडी खरेदी करीत होते. यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतीपूरक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नीरा डावा कालव्याला ओढ्या नाल्याला पाणी असल्याने या पाण्याने बैलांना व इतर जनावरांना अंघोळ घालण्यात आली. दुपारनंतर बैलांना सजवले गेले.
शिंगांना रंग लावुन आकर्षक बेगड लावण्यात आली. अंगभर विविध रंगकाम करुन सजवण्यात आले. शिंगावर मोठे मोरपंख, फुगे व गोंडे लावली होती. शेतकरी दिवसभर याच कामात मग्न होता. पुरंदर तालुक्यातील वीर, परिंचे, कांबळवाडी, मांडकी, जेऊर, पिंपरे (खुर्द), नीरा-शिवतक्रार, गुळुंचे, कर्नलवाडी तर बारामती तालुक्यातील निंबूत, फरांदेवस्ती, गडदरवाडी या गावांमध्ये शेतकरी देशी बेंदूर साजरा करतात. शर्यत बंदी उठल्यामुळे हौशी बैलगाडा मालकांनी आत नव्याने बैलजोड्या विकत घेतल्या आहेत.
काही मोजक्या शेतकर्यांकडे नांगरट व औतासाठी लागणारी बैलजोडी गावोगावी दिसुन येतात. खिलारी गाय व बैलांची संख्या आता वाढत चालली आहे. ज्या शेतकर्यांकडे स्वत:ची बैलजोडी नाही त्यांनी कुंभारांकडुन मातीची बैले विकत घेऊन देवघरा समोर पाटावर पूजा केली. ग्रामीण भागात बेंदूर हा मुळाचा सणसमजला जातो.





