– रायरेश्वर परिसरात घडली दुर्मिळ घटना भोर – रायरेश्वर पठारावरील मंदिरापासून काही अंतरावर माळवाडी येथे वाघमारे कुटुंबाच्या पाळीव म्हशीने एका बछड्याला जन्म दिला असून हा बछडा मात्र, रानगव्याप्रमाणे दिसत आहे. शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित, मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना व डोळ्यांतील चमक पाहून हे बछडे रानगव्याशी साम्य असल्याचे स्पष्ट होते. पुणे जिल्ह्यात ही दुसरी घटना असून अशीच एक घटना यापूर्वी सुस बावधन भागात घडली होती. म्हशीने रानगव्याप्रमाणे दिसणाऱ्या बछड्याला जन्म दिल्यानंतर या घटनेची वार्ता परिसरात तात्काळ पसरली. या घटनेबाबत माळवाडीतील सुरेश वाघमारे यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. वन अधिकारी इंगवले आणि वन अधिकारी भोई घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी प्राथमिक पाहणी केली. निरीक्षणानंतर हे बछडे रानगव्याच्या वैशिष्ट्यांसह असल्याचे स्पष्ट झाले. आता त्याचा नेमका वांशिक संबंध निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी व रक्त परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच बछड्याला त्याच ठिकाणी ठेवायचे की ट्रान्झिट सेंटर अथवा वन्यजीव संवर्धन केंद्रात हलवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे पाळीव म्हैस व रानगव्याच्या संगमातून जन्मलेले बछडे म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ जैविक घटना आहे. अशा संकरातून जन्मलेल्या पिल्ल्यांच्या वाढीमान, प्रजननक्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होतात. म्हणूनच वनविभागाकडून या घटनेचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. याप्रसंगी भोर तालुक्यातील ज्येष्ठ सर्पमित्र व पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य तबरेज खान तसेच सर्पमित्र विशाल शिंदे हे देखील उपस्थित होते. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांसोबत समन्वय साधत वनविभागाशी संपर्क ठेवला. वनविभागाच्या निर्णयाकडे लक्ष… पाळीव म्हशीला रानगव्यापासून बछडे झाल्याची अशी घटना घडणे ही केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुर्मिळ घटनांपैकी एक मानली जात आहे. स्थानिकांनीही या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी मानत उत्साहाने चर्चा केली आहे. आता वनविभागाचा निर्णय व वैज्ञानिक तपासणी याकडे स्थानिकांसह इतर सर्वांचेच लक्ष लागले आहे. ….