पुणे जिल्हा : ब्रॉयलर कोंबडीचे बाजारभाव गडगडले

ऐन थंडीत चिकन खवय्यांना सुगीचे दिवस
मंचर – गेल्या आठवड्याभरात ब्रॉयलर कोंबडीचे बाजारभाव गडगडल्याने ऐन थंडीत चिकन खवय्यांना सुगीचे दिवस आले आहे. दरामध्ये मोठी तफावत होऊन दर पडल्याने सध्या बॉयलर कोंबडीचे चिकन आंबेगाव तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये 160 रुपये किलो दराने विकले जात आहे.
आंबेगाव तालुक्यात 103 गावांमध्ये जवळपासचे चिकनचे पाचशे व्यावसायिक आहेत. गेल्या आठवड्यात दिवाळी, भाऊबीज सणानिमित्त घाऊक बाजारात ब्रॉयलर कोंबडीला मोठ्या प्रमाणावर उठाव होता, त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दरामध्ये मोठी वाढ केल्यामुळे ब्रॉयलर कोंबडीचे चिकन 180 रुपये किलो दराने चिकन मिळत होते;

परंतु गेल्या दोन दिवसात या दरामध्ये मोठी तफावत होऊन दर पडल्याने सध्या ब्रॉयलर कोंबडीचे चिकन आंबेगाव तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये 160 रुपये किलो दराने विकले जात आहे. चिकनचे दर हे नेहमी कंपनी व्यवस्थापन ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दरामध्ये चढ-उतार करत असल्याने बदलत असतात.
अंडी शेकडा 610 रुपये
अंडी उत्पादन करणारे बहुतांशी पोल्ट्री फार्म खाद्याचा आणि अंड्याचा दराच्या गणिताचा मेळ न बसल्यामुळे कित्येक शेतकरी अंडी उत्पादकांनी अंड्याचे पोल्ट्री फार्म कायमचे बंद करून टाकले आहेत. अंड्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अंड्याचे दर शेकडा 610 रुपयापर्यंत गेले आहेत. अंड्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात चढ-उतार होत असल्याने अंडी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या घाऊक बाजारात अंडी 84 रुपये डझन आणि किरकोळ 7 रुपयाला एक अंडे याप्रमाणे विक्री होत आहे.
मटण 700 रुपये किलो
मेंढराच्या आणि बोकडाच्या मटणालासुद्धा चांगली मागणी असून मटणाचे दर 660 ते 700 रुपये किलो दरापर्यंत गेले आहेत. गावोगाव चिकन आणि मटण व्यवसायात मोठी व्यवसायिक स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बकऱ्याच्या मटणाचे दर हे नेहमी स्थिर असून हे थोड्याफार प्रमाणात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.





