लोणी काळभोर – विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासा बरोबरच कलागुण, खेळ यांना महत्त्व देऊन वेगवेगळ्या खेळांचाही अभ्यास करावा. खेळांमध्ये ही चांगले करिअर घडवून भविष्य उज्वल करता येते, असे मत महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर यांनी व्यक्त केले. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील क्रेयॉन्स प्री स्कूलचे भारत की उडान या थीमवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन मधुबन मंगल कार्यालयात नुकतेच पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते 2001चे महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर, साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर व संचालिका वंदना काळभोर, 2022ची प्रथम महिला महाराष्ट्र केसरी कुमारी प्रतीक्षा बागडी, मांजरी येथील शिवछत्रपती कुस्ती संकुलाचे संस्थापक प्रकाश सावंत, राज्य पातळीवरील पदक विजेती कुमारी जानवी गोडसे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलेश काळभोर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रेयॉन्स प्री स्कूल व डे केअर या शाळेचे भारत की उडान या थीमवर असलेले वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात व थाटामाटात पार पडले. यावर्षीचे कार्यक्रम जी 20 शिखर परिषद अध्यक्षपद, चंद्रयान 3 व आशियाई स्पर्धा 2023 भारत देशाच्या प्रमुख तीन कामगिरींवर आधारित होते. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष कमलेश काळभोर म्हणाले चालू वर्षी जी 20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद, भारताची चंद्रयान 3 मोहीम व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश व सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश या कामगिरीमुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्या विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरने अनेक यशस्वी चाचण्या करून नवीन संशोधन करीत इतिहास रचला. त्याचबरोबर आशियाई स्पर्धेत प्रथमच भारताने शंभर पदकांचा आकडा पार केला. वरील तीनही यशस्वी मोहिमांचे कौतुक म्हणून यावेळी विविध प्रकारचे सादरीकरण बाल चमुंनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन व राष्ट्रगीताने झाली. मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या संचालिका सोनाली मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्या रूषदा बारवकर यांनी तर संचालिका अॅड. श्वेता काळभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेची दुसरी शाखा थेऊर येथे होणार असे आयोजकांनी जाहीर केले. त्याचबरोबर शाळेची वेबसाईट ुुु. ज्ञीरूेपीिीशीलहेेश्र. लेा चे अनावरण करण्यात आले.