बारामती येथील सभेत निषेध : आयएमएच्या कार्यकारिणीकडून संताप बारामती – राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेला निर्णय चुकीचा, धोकादायक व जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बारामती शाखेने केला आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत चुकीचे औषधोपचार, चूक निदान, सर्जिकल अज्ञान यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. यामुळे मान्यताप्राप्त एमबीबीएस डॉक्टरांची प्रतिमा मलिन होऊ शकते, असा संतप्त सूर उमटला. राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात बारामती आयएमएच्या कार्यकारिणीची सभा झाली. यावेळी शासनाच्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या संबंधीत निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला. भविष्यात समस्या आणि भविष्यावर उद्भवणाऱ्या धोक्यावर चर्चा केली. यावेळी राज्य संघटनेच्या निर्णयानुसार बारामतीतील अत्यावश्यक सोडून सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात याचिका असतानाही हा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. या निर्णयाविरुद्ध राज्यासह बारामतीत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी बारामती शाखा अध्यक्ष डॉ. संतोष घालमे, सचिव अमोल भंडारे व खजिनदार डॉ. सौरभ निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी कार्यकारिणीतील डॉ. अशोक तांबे, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. महेंद्र दोशी, डॉ. विक्रांत धोपाडे, डॉ. दिनेश ओस्वाल, डॉ. सौरभ मुथा, डॉ. विभावरी सोळुंके, डॉ. स्नेहलता पवार, डॉ. रेवती संत, डॉ. प्राजक्ता पुरंदरे, डॉ. दिपीका कोकणे, डॉ. शुभांगी वाघमोडे आदी उपस्थित होते. ब्रिज कोर्सचे रुग्णांसाठी धोके होमिओपॅथी व ॲलोपॅथी डॉक्टरांची कुठेही तुलना होऊ शकत नाही. एमबीबीएस प्रशिक्षित डॉक्टर संपूर्णपणे सायंटिफिक व पुराव्याधारित शिकतात. बीएचएमएस डॉक्टरांचे शिक्षण हे पूर्णतः होमिओपॅथीवर आधारित असते. त्यांना आधुनिक औषधे, सर्जरी, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत नाही. १ वर्षाच्या ब्रिज कोर्समध्ये अत्यल्प प्रमाणात फार्माकॉलॉजी, मेडिसीन यांचे प्राथमिक ज्ञान दिले जाते. हा कोर्स कोणत्याही प्रकारे एमबीबीएस सरासरीच्या ५.५ वर्षांच्या अभ्यासक्रमास तुल्य नाही. अशा डॉक्टरांना ‘मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर’ म्हणून मान्यता दिली तर सामान्य रुग्ण गोंधळात पडतील. हा निर्णय रुग्णांसाठी धोकादायक आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरण असूनही निर्णय फार्माकॉलॉजी या विषयात एक वर्षाचा ब्रिज कोर्स करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करणार आहेत. (दि.१५) पासून ही नोंदणी सुरू होईल. ती पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर्स ॲलोपॅथीची औषधे लिहून देऊ शकतील. त्यांना कौंसिलची मान्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात आयएमएने महाराष्ट्र शासनाच्या संभाव्य निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. ती न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय झालेला नसतानाही शासनाने १५ जुलैपासून होमिओपॅथी डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.