Pune District : गोळेवाडी, म्हसर बुद्रुक येथील पूल पाण्याखाली

– हिरडस मावळात मुसळधार पाऊस
हिरडस माव – भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ भागात मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिरडस मावळ भागात मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु दोन दिवसांपासून मात्र, जोरदार हजेरी लावली आहे.
निगुडघरवरून म्हसर येथे जाणाऱ्या मार्गावरील गोळेवाडी आणि म्हसर बुदुक येथील पूल सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पाण्याखाली गेल्याची घटना दि.१९ रोजी घडल्याने काही काळ वाहतूक देखील बंद झाली होती. तसेच या भागातील नागरिकांचा संपर्क देखील तुटला होता.
स्थानिक नागरिकांनी सदर पुलाच्या मोरीमध्ये अडकलेला गाळ,लाकडे काढल्यामुळे काही वेळानंतर पाणी ओसरले आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरवर्षी या पुलावर ओढ्याचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प होत असते. तसेच नागरिकांची गैरसोय देखील होत असते.
नुकताच हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला असून पुलाच्या कामांविषयी संबंधित ठेकेदारास पावसामुळे ओढ्याला जास्त पाणी येत असल्यामुळे मोऱ्यांच्या संख्या वाढवावी. तसेच पुलाची उंची वाढवावी अशी वारंवार मागणी करून देखील संबधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले.परंतु याचा नाहक त्रास मात्र या भागातील नागरिकांना होत आहे.
निगुडघर ते म्हसर रस्ता हा नेहमीच दर पावसाळ्यात पाण्याखाली जात असतो. या मुळे आम्हाला या भागात जाता येत नाही. तसेच गोळेवाडी, करंजगाव, म्हसर खुर्द, म्हसर बुद्रुक या गावांचा संपर्क देखील तुटतो. आमच्या भागातील हा मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणी नवीन पूल व्हावात्यानंतरच नागरिकांचा त्रास वाचेल.
– देवा म्हसुरकर, माजी उपसरपंच, म्हसर.
– दिनेश शिंदे – सामाजिक कार्यकर्ते





