Pune District : ब्राह्मण समाज सक्षमीकरण योजनेत

आराखडा तयार करण्याचे काम शासनस्तरावर जलद गतीने सुरू – दामले
जुन्नर – ब्राह्मण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता कर्ज योजना देश परदेशातील उच्च शिक्षणाकरिता कर्ज योजना, महिला बचत गटांकरिता रमाबाई रानडे कर्ज योजना सुरू करण्यात येणार असून या सर्व लाभदायी योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम शासनस्तरावर जलद गतीने सुरू असल्याची माहिती परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी दिली.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र जुन्नरच्या वतीने ब्राह्मण समाज बांधव मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना दामले बोलत होते याप्रसंगी चंद्रशेखर जोशी, मंगल चिंतामणी, प्रफुल्ल कुलकर्णी, उमेश अवचट, भरत घोलप, हेमंत महाजन, हरिष भवाळकर, शाम जोशी, जितेंद्र पारुंडेकर, रश्मी घोलप, छाया जोशी, तृप्ती सोनपाटकी, महेश तपस्वी, अनिल भगत, सोनू पुराणिक आदींसह जुन्नर, नारायणगाव, ओतूर, बेल्हे परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.
राज्यभरातील ब्राह्मण समाज बांधवांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करण्याकरिता परशुराम आर्थिक महामंडळाने कामकाज सुरू केलेले असून याकरिता गोखले इन्स्टिट्यूट या पुण्यामधील संस्थेकडे पत्रव्यवहार केला असल्याचे आशिष दामले यांनी यावेळी स्पष्ट केले. ब्राह्मण समाजातील अनेकजण पौरोहित्याचे काम करीत असतात. त्यांना हे कार्य करीत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. याकरिता एक संस्था स्थापन करून त्यामाध्यमातून पुरोहितांचे विविध प्रश्न सोडविले जाणार आहेत.
तसेच त्यांच्याकरिता एक छोटा कोर्स तयार करून त्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत विचार सुरू आहे. पुरोहितांना कर्ज मिळणे बाबतचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे यापुढील कामकाज हे इतर महामंडळांना आदर्श ठरेल असेच होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाचे काम आदर्शपणे होणार असल्याची ग्वाही कॅप्टन दामले यांनी यावेळी दिली.





