पुणे जिल्हा : मंडळांनी डीजे, डॉल्बी किंवा लेझर लाईटचा वापर टाळावा

– शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांचे आवाहन
मंचर – गणेश उत्सव मंडळांनी डीजे, डॉल्बी किंवा लेझर लाईट याचा मात्र कटाक्षाने वापर टाळावा. त्यातून शारीरिक हानी होते, असे मत मंचर येथील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी व्यक्त केले.
निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील मुंजोबा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सव येथे मंडळाच्या पदाधिकाऱ्र्यांना मार्गदर्शन करताना शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा बोलत होते. यावेळी सरपंच नवनाथ निघोट, सुहास बाणखेले, समाजसेवक निळूभाऊ काळे, दत्ता थोरात, संतोष माशेरे, संजय बाणखेले, सचिन बाणखेले, लक्ष्मणराव थोरात, मंडळाचे अध्यक्ष अशोक निघोट, संदीप निघोट, शैलेश निघोट, योगेश निघोट, संदीप राजगुरू यांच्या सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गरीब,गरजूंना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करावे, गरीब कुटुंबातील कोणी आजारी असेल त्याला आर्थिक मदत करावी किंवा आदिवासी भागात कुपोषणाची समस्या आहे. यासाठी कुपोषित महिलांना आर्थिक सहकार्य करावे,यातून समाज घडवण्याचे काम करावे. त्यातून वेगळा आनंद मिळतो.
गणेश उत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव म्हणून सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. गणेशोत्सव कार्यक्रमात गणेश मंडळांनी खर्चात काटकसर करून वर्षभर विधायक कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करावे, समाज जनजागृतीचे काम करावे, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी देखाव्यातून प्रबोधन करावे.
प्रदूषण टाळा…
देवेंद्रशेठ शहा म्हणाले, गणेश उत्सव कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच मैदानी स्पर्धांचे मंडळांनी आयोजन करावे. त्यातून अनेक खेळाडू निर्माण होतील. गणेश विसर्जन मिरवणुकीत गणपती मूर्ती विसर्जन करताना काळजी घ्यावी. अन्यथा दुर्घटना होतात. त्यासाठी प्रत्येकाने गणेश उत्सव किंवा गणेश मूर्ती विसर्जन करताना काळजी घ्यावी. किंवा हौदामध्ये गणेश मूर्ती विसर्जन केल्यास प्रदूषण टाळण्यासाठी मदत होईल. असे आवाहन त्यांनी केले.





