Pune District : कडू कारले इंदापूर तालुक्यात उत्पन्नाच्या बाबतीत ठरतय गोड

-अवघ्या दोन अडीच महिन्यातच शेतकरी कामावतात लाखो रुपये
नीलकंठ मोहिते
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी,वरकुटे खुर्द,काटी या परिसरात बहुतांश शेतकरी बांधव कारले पिकांकडे वळले आहेत. परिसरात शेकडोंहून अधिक शेतकऱ्यांनी कारले वेलाची लागवड केली असून,तालुक्यातील प्रत्येक गावात भरणाऱ्या आठवडे बाजारात हे कडू कारले शंभर रुपयांच्या वर किलोला दर मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कडू कारले, उत्पन्नाच्या बाबतीत मात्र गोड ठरत आहेत.
इंदापूर तालुक्याच्या भागात बागायती क्षेत्र असल्यामुळे,गेल्या काही वर्षापासून परिसरातील शेतकरी बांधवांकडून आपल्याकडे असलेल्या एकूण क्षेत्रफळापैकी,काही क्षेत्रफळावर कारले वेल सोबत दोडके,भोपळे आदी पिकांसाठी बांबूचे मंडप उभारून लागवड केल्या जात आहे. सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात शेतकरी कारले पिकांची लागवड करीत असत.त्यावेळेस कारले तोडून पंचा भरून इंदापूर, बावडा, भिगवण, निमगाव केतकी येथील भाजीपाला सह कारले,विक्रीसाठी घेऊन जायचे.
त्यावेळेस बाजारपेठेतील कारले आवकनुसार ५ रुपये, ८ रुपये, १० रुपये असा भाव मिळायचा,तर केव्हा केव्हा १५ रूपये,२० रुपये सुध्दा भाव मिळायचा. कालांतराने परिसरात कारले लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत गेली.भाजीपाला पिकवण्याचे म्हणून आगार झालेल्या निमगाव केतकी,वरकुटे खुर्द, काठी व बॅकवॉटर परिसरातील गावातील शेतात,शेतकरी अधिकचा दर कडू कारल्याला मिळत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात कारले वेलाची लागवड केलेली दिसते आहे.
“बांधावरच कारले विक्री “
कारले उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने,या व्यवसायात आता दूर दूरचे व्यापारी परिसरातील एजंटमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावरच कारले ६० रुपये, ७० रुपये,किलो दराने विकत घेऊ लागले. हैदराबाद,वाशी,मुंबई,संभाजीनगर,पुणे या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संपर्क करून या भागातील एजंट बांधवांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच कारले विकत घेणे सुरू केलेले असल्याने, शेतकऱ्यांनाही कारल्याचा चांगला भाव मिळत आहे.तर परिसरात विकत घेतलेले कारले हे दूर दूर पर्यंत विक्रीस जात आहेत.
“दोन अडीच महिन्यात मिळतात लाखो रुपये “
अवघ्या दोन अडीच महिन्याचे कारले पीक असून,कमी क्षेत्रफळातच चांगले उत्पन्न निघत आहे. फक्त वातावरणातील बदलाचा व व्हायरसचा परिणाम वेल पिकावर वेळोवेळी होत असल्याने,दक्षता ठेवावी लागते व वेळोवेळी औषध फवारणी करावी लागत असल्याचे प्रगतशील शेतकरी साहेबराव मोहिते यांनी सांगितले. दरवर्षी कारले पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. दोन ते अडीच महिन्यात लाखो रुपये कारले शेतीतून मिळत आहेत.





