पुणे जिल्हा : बिबट मानव संघर्षावर उपायोजनांचा पाठपुरावा करणार

एन. आर. प्रवीण : पुण्यातील बैठकीत निर्णय
नारायणगाव – जुन्नर तालुक्यात बिबट मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून विधानसभा सदस्यांच्या गठीत समितीने सुचविलेल्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.
पुणे येथे वनभवनमध्ये बिबट मानव संघर्ष उपायोजना सुचविण्यासाठी विधानसभा सदस्यांच्या गठित समितीची बैठक पार पडली त्यावेळी बोलत होते.
यावेळी विधानसभा सदस्य जुन्नर समिती सदस्य मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, शिरूरचे आमदार अशोक पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विभागीय वनाधिकारी राम धोत्रे, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, प्रताप जगताप उपस्थित होते.
बैठकीत सहाय्यक वनसंरक्षक जुन्नरचे अमित भिसे यांनी जुन्नर वन विभागाअंतर्गत बिबट मानवी संघर्षाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आमदार बेनके यांनी मानव बिबट समस्या निवारणासाठी वन विभागाने शासनास पाठवलेले प्रस्ताव, जसे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे, बिबट वन्य प्राण्याची नसबंदी, बिबट रेस्क्यू टीमचे बळकटीकरण, पिंजरे वाहन खरेदीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आमदार पवार यांनी बळकटीकरण व बिबट पकडण्यासाठी नवीन सुधारणा करून शासन दरबारी प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या. पकडलेले बिबटे लांबच्या अभयारण्यात किंवा दुसऱ्या राज्यात पाठविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे सांगितले.





