पुणे जिल्हा : भोरला आज राजकारणातील वस्ताद येतोय

कापूरहोळ-हरिश्चंद्री येथे शरद पवार यांची सभा
भोर – भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचाराची सांगता सभा सोमवार (दि.१८) रोजी पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री – कापूरहोळ येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित केली आहे.
महाविकास आघाडीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा पद्मविभूषण खासदार शरद पवार यांची जाहीर सभा होणार असल्याचे भोर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक पैलवान घडवणारा वस्ताद स्वराज्यभूमी भोर-राजगडच्या मातीत आमदार संग्राम थोपटे यांच्या विजयासाठी येत आहे. सभेत शरद पवार हे काय बोलणार, याकडे संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील मागील १५ ते २० दिवसांत संपूर्ण मतदारसंघातील गावोगावी भेट देवून मतदारांशी संवाद साधला आहे.
सभेला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील हजारो मतदार माता- भगीनींसह नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला असून हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.





