पुणे जिल्हा : 12 जानेवारीला शिवकार्याचा भूमिपूजन सोहळा

जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज
जुन्नर : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज या शिवकार्याचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 12) छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जुन्नरचे माजी आमदार तथा श्रीमंतयोगी सुवर्ण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष शरद सोनवणे यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील गोद्रे याठिकाणी सुमारे 25 एकर जागेत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारण्याचा संकल्प श्रीमंतयोगी सुवर्ण स्मारक ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेला असून याठिकाणी आयोजीत पत्रकार परिषदेत शरद सोनवणे बोलत होते.
या पत्रकार परिषदेत अविनाश कर्डीले, दर्शन फुलपगार, संतोष वाघ, दत्ता गवारी, शाम खोत, विक्रम परदेशी, मनोज शिंदे, गणेश पातूरकर, गोद्रे गावाच्या सरपंच अनिता रेंगडे, भिमाजी उतळे, दिलीप गायकवाड, रमेश रेंगडे आदींसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद सोनवणे म्हणाले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती दिनी गोद्रे येथे 51 ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत विधिवत धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
250 फूट डोंगरावर 50 फूट चबुतरा व त्यावर 111 फूट उंचीचा पंचधातूचा पुतळा जो आगामी 500 वर्षे टिकेल असा तयार करण्यात येऊन येत्या वर्षभरात या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात येणार आहे. या पुतळ्यामागे जगातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज बसविण्यात येणार आहे. हा पंचधातूचा पुतळा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा असणार आहे. केवळ भारतीय कारागीर तो घडविणार आहेत.
या सोहळ्याचे निमंत्रण जुन्नर तालुक्यातील 80 हजार घरांमध्ये देण्यात येणार असून राज्यातील सर्व खासदार व आमदार तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबरोबर स्वराज्यासाठी कार्य केलेले सेनापती, सरदार यांचे असणारे वंशज यांनाही सन्मान देऊन या सोहळ्याला निमंत्रित करण्यात येणार आहे.
प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
श्रीमंतयोगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट यामध्ये प्रामुख्याने अठरा पगड जातीच्या लोकांचा समावेश केला असून या माध्यमातून गोद्रे येथे विविध प्रकल्प ज्यामध्ये शिवरायांचे सुवर्णमंदिर निर्माण करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोन्याचे सिंहासन, सोन्याची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. यांसह संग्रहालय, लेझर शो यातून शिवरायांचे चरित्र दाखविण्यात येणार असून याठिकाणी भोजनालय व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन केले असून यामध्ये सर्वांनी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन शरद सोनवणे यांनी केले आहे. हे राजकीय कार्य नसून या शिवकार्यात सर्वांनी मनमोकळेपणाने सहभागी होऊन या प्रकल्पकरिता सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन शरद सोनवणे यांनी केले आहे.





