पुणे जिल्हा : भरणेंची तीन गटांत लागणार कसोटी?

अनेक पदाधिकारी नसताना हर्षवर्धन पाटलांना मतदारांची साथ
इंदापूर – इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत आमदार दत्तात्रय भरणे 19, हजार 410 इतके मतांचे लिड घेत विजयी झाले. असे असले तरी देखील तीन जिल्हा परिषद गटात हर्षवर्धन पाटील यांनी चांगल्या पद्धतीचे मतदान घेतले आहे. तर नवखे अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण माने विधानसभा निवडणुकीत उभे असतानाही पळसदेव गट व बावडा गटात समाधानकारक मतदान घेतले आहे. त्यामुळे या भागात विकास करताना अधिकचे लक्ष आमदार दत्तात्रय भरणे यांना द्यावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या दुसर्या दिवसापासून जनतेच्या संपर्कात आले आहेत.निवडणुकीत हार-जीत असते याचा विचार करत सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते मतदारांचे आभार मानत आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेले दिसत आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना ऐन निवडणुकीत अनेक जण सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरे दाखल झाले. तसेच काहींनी अपक्ष उमेदवारांना साथ दिली.
तरीही हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यात असणारे विविध संस्थांचे जाळे, साखर कारखाने यामुळे मतदारराजा देखील मोठ्या ताकतीने हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला. आमदार दत्तात्रय भरणे यांना विधानसभेत हॅट्ट्रिक करत मिळालेले यश, अधिक तालुक्यात लक्ष देऊन आगामी काळात जनतेच्या सेवेसाठी घालवावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत लहान मोठ्या नेत्यांनी अनेक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र निवडणुकीचा निकाल लागताच पुन्हा गावच्या कट्ट्यावर बाजारपेठेत नमस्कार चमत्कार होऊ लागले आहेत. इंदापूर तालुक्यात संस्कार संस्कृती जपणारे नेतेमंडळी कार्यकर्ते असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
या गटावर करावे लागणार लक्ष केंद्रीत
इंदापूर तालुक्यात प्रामुख्याने सात जुन्या जिल्हा परिषदेचे गट आहेत यामध्ये काटी-वडापुरी या जिल्हा परिषद गटात अवघे 277 मतांचे लीड आमदार भरणे यांना मिळाले आहे. तर बावडा-लाखेवाडी हा जिल्हा परिषद गट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो यामध्ये 3213 इतके लीड हर्षवर्धन पाटील यांना मिळाले आहे. सणसर-लासुर्णे हा जिल्हा परिषद गट आमदार दत्तात्रय भरणे यांना 104 मतांनी प्लस राहिला आहे त्यामुळे या तालुक्याचे अर्धा भाग असणार्या तीन जिल्हा परिषद गटात आमदार भरणे यांना पुन्हा एकदा,मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
आगामी निवडणुकीसाठी सज्ज
अपक्ष उमेदवार प्रवीण माने इंदापूर विधानसभेसाठी उभे राहिले तरीदेखील त्यांना पळसदेव गट व बावडा गटात चांगले मतदान मिळाले आहे. प्रवीण माने यांना 37 हजार 917 इतके मतदान मिळाल्याने,आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत प्रवीण माने यांनी मतदारांच्या आभार सभेत बोलून दाखवले आहेत.





