पुणे जिल्हा : निमगावात भंडारा खोबर्यांची उधळण

खंडोबाच्या दर्शनासाठी रीघ : नवसाचे बैलगाडे धावले
राजगुरूनगर – महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या निमगाव (ता. खेड) येथे माघी पौर्णिमेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येनेे भाविक आले होते.सदानंदाचा येळकोट, येळकोट व भंडार खोबर्यांची उधळण करीत लाखो भविकांनी शनिवारी (दि. 24) खंडोबाचे दर्शन घेतले. तर मनाचा घाट असलेल्या निमगाव बैलगाडा घाटात नवसाचे बैलगाडे मालकांनी दिवसभर घाटात पळविले.
खेड तालुक्यात निमगाव , देवतोरणे, कडधे, खरपुडी खुर्द या गावांमध्ये खंडोबा देवाची ठाणी आहेत. माघी पौर्णिमेनिमित्त याठिकाणी मोठ्या उत्साहाने खंडोबा देवाची यात्रा भरते.या यात्रेनिमियताने येथे हजारो भाविक भक्त तळी भंडार करण्यासाठी येत असतात. राज्यातून आलेल्या भाविक भक्तांनी खेड तालुका भक्ती सागरात न्हाऊन निघाला आहे.
गर्दीमुळे निमगाव व परिसर फुलून गेला होता, रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. सकाळी पूजा अभिषेक होऊन खंडोबा देवाचे लग्न झाले. व दर्शनाला सुरवात झाली. यात्रा कमिटीने भाविकांना दर्शन बारी व वाहन पार्किंगची सोय केली होती. तसेच खेड पोलिसांनी व ग्रामस्थांनी खंडोबा मंदिर व मंदिराच्या चोहोबाजूनी भाविकांची वाहने ये-जा करण्यासाठी व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. वाहन पार्किंगसाठी मोकळी जागा तयार केल्यामुळे वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडी झाली नाही. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. खंडोबा मंदिर परिसरात कुलधर्म कुलाचार करित भाविक देवाची तळी भंडार भरुन दर्शन घेत होते. पूर्वापार चालत आलेले देवाचे नवसांचे बैलगाडे घाटात पळविण्यात आले.
दरम्यान आमदार दिलीप मोहिते पाटील, शरद पवार गटाचे नेते सुधीर मुंगसे आदी मान्यवरांनी भेट देऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या. मंदिर परिसरात दुचाकी व मोठी वाहने येऊन गर्दी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तैनात करण्यात आले होते.
मंदिर मार्गावर व परिसरात खोबरे, भंडारा फुलांचे हार, देववस्त्र, खेळणी, हॉटेल, कलिंगड, ज्वेलरी, शेवरेवडी आदी दुकाने थाटली होती. मंदिर परिसरात भविकांनी जागरण गोंधळ घातला दिवसभरात 100 पेक्षा अधिक जागरण गोंधळ झाले. दिवसभरात लाखो भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. व यात्रा सुरळीत पार पडण्याकरिता देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष बबनराव शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, संतोष शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, मोहन शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष युवराज शिंदे, बबनराव थोरात, संभाजी राऊत, नवनाथ तांबे, दत्ता दाभाडे , बाळासाहेब भगत यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.





