पुणे जिल्हा : कागदपत्रांसाठी लाडक्या बहिणींची झुंबड

महा ई सेवा केंद्र, तहसीलदार कार्यालयात लाडक्या बहिणींची गर्दी
भोर – महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत १५०० रुपये महिलांच्या खात्यामध्ये याच महिन्यांपासून जमा होणार आहेत. या साठी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट,उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत उत्पन्न दाखला, बँकेमध्ये महिलेचे नावे खाते,रेशन कार्डमध्ये सदर महिलेचे नाव ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी भोर शहरासह ग्रामीण भागातील महिलांची झुंबड तलाठी कार्यालय,महा ई सेवा केंद्र, तहसीलदार कार्यालयात उडाली आहे.
भोर शहरातील राजवाडा परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या योजनेस पात्र होण्यासाठी महिलांना दोन लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असलेले तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्याने ऐन शेतातील कामे अंतिम टप्प्यात असताना सुद्धा महिलांनी कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी गर्दी केली होती. या योजने करीता राज्य शासनाने १५ दिवसांचा कालावधी दिला असल्याने आपलं काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी महिला घराबाहेर पडलेल्या पहावयास मिळाले.
अंगणवाडी सेविका मदतनीस यांना महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कार्यवाहीसाठी महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत आवश्यक असलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता करून ऑनलाईन करून घ्यावयाची आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना “नारी शक्तीदुत अॅप “प्ले स्टोअरवरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेवून कार्यवाही करावी.
– भाऊसाहेब बोरकर, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी, भोर





