पुणे जिल्हा : लाडक्या बहिणी मामांच्या मागे भक्कम उभ्या

सारिका भरणेंनी व्यक्त केला विश्वास : चाकाटी, बावडा परिसरात आमदार भरणेंचा प्रचार
बावडा – आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील महिला भगिनींसाठी शासनाच्या विविध योजना राबवून, महिलांना प्रगतीच्या दिशेने यशस्वी पोहोचवले आहे.त्यामुळे तालुक्यातील लाडक्या भगिनी आमदार भरणे मामांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहतील, असा विश्वास इंदापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी व्यक्त केला.
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी चाकाटी व बावडा परिसरातील गावांमध्ये आमदार भरणे यांच्या प्रचारार्थ सारिका भरणे यांनी महिलांच्या गाठीभेटी घेत घोंगडी बैठका घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसांगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मनोज जगदाळे, महिला उपाध्यक्ष सिमा काळंगे, चाकाटी गावच्या सरपंच हर्षाली मारकड, माजी सरपंच मनिषा रूपनवर, स्नेहा रूपनवर, आबासाहेब मारकड, प्रदीप रुपनवर, उमाजी जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सारिका भरणे म्हणाल्या की, इंदापूर तालुक्यातील महिला या कधीही घरातील चूल आणि मूल या पलीकडे गेलेल्या पाहिल्या नव्हत्या; परंतु शासनाच्या धोरणानुसार महिलांनी बचत गट स्थापन करून स्वयंरोजगार निर्मिती अनोख्या पद्धतीने केले आहे. यामध्ये आमदार भरणे यांनी महिला बचत गटांसाठी, राष्ट्रीयकृत बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी मदत केली आहे. त्यामुळे महिला सक्षम झाले आहेत असे त्यांनी नमूद केले.
युवा मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा
इंदापूर तालुक्यातील युवक, युवती, महिला घड्याळ चिन्हाचा प्रचार करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. यामुळे तालुक्यातील युवा, नवा मतदार राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचा निर्माण झाला आहे. तालुक्यातील महिलांना आगामी काळात हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आमदार भरणे करणारच आहेत, अशीही माहिती सारिका भरणे यांनी यावेळी दिली.





