पुणे जिल्हा : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यासाठी ग्रामीण भागात सुरुवात

हिरडस मावळ – भोर तालुक्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील ६५ वर्षांपुढील नागरिकांनी गर्दी केली आहे.
या योजनेचा फॉर्म आशा सेविका यांच्याकडे जमा करायचे आहेत. राज्यातील ६५ वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना साधने खरेदी करण्यासाठी शासनामार्फत ३ हजार रुपये दिले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधन,उपकरणे यात चष्मा,श्रवणयंत्र,ट्रायपॉड,स्टिक, व्हीलचेअर,फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर,इत्यादी वस्तू खरेदी करता येणार आहेत.
१ एप्रिल २०२४ पासून ज्यांचे वय ६५ वर्ष पूर्ण झालेले आहे. या सर्व ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ३००० रुपये मिळणार असून त्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक,मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड, आयुष्मान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड यापैकी कोणतेही एक झेरॉक्स तसेच २ फोटो लागणार आहेत. तरी लवकरात लवकर लाभार्थ्यांनी १० सप्टेंबरपर्यंत आपल्या गावातील आशा सेविका यांच्याकडे अर्ज भरून द्यावेत.





