Pune District :दिवे घाटात गर्दीच्या नियंत्रणासाठी बॅरिकेटिंग

दिवे – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे लाखो वारकऱ्यांसह ऐतिहासिक दिवे घाटातून रविवारी (दि.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास पुरंदर तालुक्यात प्रवेश होत आहे. हा सोहळा याची देहू याची डोळा पाहण्यासाठी सकाळपासूनच दिवे घाटात नेहमीप्रमाणे गर्दी राहणार आहे. मात्र यंदा घाटातील रस्ता रुंदीकरण चालू असून संपूर्ण घाटात रस्त्यासाठी डोंगर फोडला आहे. अशा परिस्थितीत डोंगरावर लोकांची गर्दी उसळल्यास अपघात किंवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सासवड पोलिसांनी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग केले आहे. नागरिकांनी डोंगराकडे जाऊ नये असे आवाहन पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.
आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होत असून हडपसरवरुन सासवडला जोडणाऱ्या दिवे घाटातील रस्त्याचे सध्या रुंदीकरण सुरू आहे. यापूर्वी रस्ता केवळ सात मीटर असल्याने वाहतुकीचा मोठा त्रास होत होता. पालखी काळात लाखो वारकरी, त्यांची वाहने एकाच रस्त्याने जाताना वारकरी, चालक आणि प्रशासनाची दमछाक होत होती. यंदा घाटात रुंदीकरण सुरू असल्याने आता रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लाखो वारकरी मोठ्या उत्साहात दिवे घाटातून मोठ्या आनंदाने प्रवास करणार आहेत.
यंदाच्या वारीत गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. झेंडेवाडीपासून दिवे घाटातील डोंगराकडे लोकांना जाण्यापासून रोखणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वीच घाटातील डोंगराकडे जाणाऱ्या लोकांना रोखावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक परिपत्रक जाहीर केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी जाहीर आदेश दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिवे घाटातून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग लावून रस्ता बंद केला आहे. डोंगराकडे कोणीही जाऊ नये अशा सूचना केल्या आहेत.





