Pune District : बारामतीची कृषीपंढरी गजबजली

बारामती : बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या दहाव्या कृषी प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातूनही हजारो शेतकर्यांनी गर्दी केली. पुरुष शेतकर्यांबरोबरच महिला आणि युवक, युवतींची संख्या यामध्ये लक्षणीय होती.
राज्यभरातून शुक्रवारी (दि. 17) सकाळी आठ वाजल्यापासूनच आलेल्या वाहनांनी येथील परिसर गजबजून गेला होता. या प्रदर्शनाला भाजपचे आमदार सुरेश धस तसेच कोल्हापूरच्या संयोगिताराजे छत्रपती, माजी मात्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व विश्वस्त सुनंदा पवार यांनी त्यांना अधिक माहिती दिली. कृषिक प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही भेट दिली.
होमिओपॅथी औषधावर आधारित आणि लुप्त होत चाललेल्या देशी वाणांना पुनर्जीवित करण्यासाठी घेतलेल्या तब्बल 58 प्रकारची पिके पाहत शेतकर्यांनी आवर्जून याची माहिती घेतली. पिकावर कोणत्याही प्रकारचा रासायनिक प्रादुर्भाव न करणारी होमिओपॅथिक औषधे भविष्यातील शेतीसाठी उपयोगी पडतील याची खूणगाठ बांधत त्या औषधांचे प्रमाण आणि औषधांची माहिती शेतकरी आवर्जून घेत होते.
कृषी प्रदर्शनाचे ठिकाण उत्तम आहे, प्रदर्शन ठिकाणचे प्लॉट वरील मार्गदर्शन नाविन्य आणि प्रदर्शन दर्जा उत्तम आहे, ऊसातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॉट आवडले.
सुरेश मोते, शेतकरी, नेवासा जि. अहिल्यानगर
राशी कापूस पिकाची पाहणी
विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाची शेती सर्वाधिक असल्याने या शेतीशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी शेतकर्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात उत्पादित केलेल्या राशी या जातीच्या कापूस पिकाची पाहणी केली. त्याचबरोबर कापूस पिकामध्ये यांत्रिकीकरणाची युग आणल्यास शेतकर्यांना दिलासा मिळू शकतो असा विश्वास देखील या ठिकाणी नाशिकच्या किशोर वाघ व त्यांच्या सहकार्यांनी शेतकर्यांना दाखवलेल्या प्रात्यक्षिकातून आला.
11 कोटींचा सोनेरी मारवाडी घोडा
पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन असलेल्या या या प्रदर्शनात हैदराबादच्या हसन बिन त्रीप यांनी आणलेला 11 कोटींचा सोनेरी मारवाडी घोडा तसेच नांदेडच्या मालेगाव तालुक्यातील लोहा तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांनी आणलेल्या राम व रावण या लालकंधारी जातीच्या बैलांची जोडी तसेच माणसाळलेली व माणसाला मुका देणारे सोन्या, मोन्या बैल शेतकरी आवर्जून पाहत होते.
आर्टिफिशल इंटेलिजन्स
या वेळच्या प्रदर्शानाचे वैशिष्ट्य ठरलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित ऊसाच्या शेतीवरती सर्वाधिक गर्दी शेतकर्यांनी केली होती. या ठिकाणी उसाच्या विविध जाती कशाप्रकारे वाढलेल्या आहेत आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्र नेमके कसे काम करते हे शेतकर्यांनी या ठिकाणी जाणून घेतले.





