पुणे जिल्हा : पिंपळगाव खडकीत पाळला बंद

मंचर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 3) बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. याबाबत पोलिसांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि पिंपळगावचे माजी उपसरपंच प्रभाकर बांगर यांच्यावर सोमवारी (दि. 2) जुन्नर येथे जात असताना एकलहरे (ता. आंबेगाव) च्या हद्दीत काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांच्या गावी पिंपळगाव खडकी येथे ग्रामस्थांनी एकत्र येत गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला.
बांगर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना मंचर पोलिसांनी तात्काळ अटक करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये रास्ता रोको, गाव बंद आंदोलन केले जाईल, असे शेतकरी संघटनेचे वनाजी बांगर व युवासेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन बांगर यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी दहा जणांवर गुन्हा दाखल
मंचर – प्रभाकर बांगर यांना मारहाण केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात ऋषी वर्पे (रा. कळंब), संतोष माशेरे (रा. मंचर) यांच्यासह इतर आठ व्यक्तींवर हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 3) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रभाकर बांगर यांनी दिली.
प्रभाकर बांगर आणि वनाजी बांगर हे दुचाकीवरून सोमवारी (दि. 2) सकाळी जुन्नर येथे जात असताना एकलहरेच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर ऋषी वर्पे, संतोष माशेरे आणि इतर आठ जणांनी प्रभाकर बांगर आणि त्यांच्या बरोबर असलेले वनाजी बांगर यांना सहकार मंत्री वळसे पाटील आणि देवेंद्र शहा यांच्याविरुद्ध आंदोलन करतो का, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली आणि पुन्हा असे कृत्य केल्यास तुला सोडणार नाही, अशी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.





