पुणे जिल्हा : नागापूरची केळी निघाली इराकला

किलोला २८ रुपये ः ८ लाख रुपयांचा नफा अपेक्षित
रांजणी – नागापूर (ता. आंबेगाव ) येथील शेतकर्याच्या शेतातील केळी पहिल्यांदाच परदेशात जात आहे . नागापूर येथील शेतकरी नारायण रोहिदास वाघ, प्रवीण वाघ, बाळासाहेब वाघ यांनी केळीचे पीक आपल्या शेतात घेतले आहे.
यंदा परदेशात केळीला मागणी चांगली असल्या कारणाने त्यांनी केळी इराकला पाठवण्याचे ठरवले आहे. किलोला २८ रुपये प्रमाणे केळीला भाव आहे. वाघ यांनी एक एकर क्षेत्रात केळीचे पीक घेतले आहे.
वाघ यांना केळी पिकाला मशागत, शेणखत, रासायनिक खते, मजुरी असा सुमारे एकरी एक लाख रुपये खर्च आला आहे. यावर्षी वातावरणातील बदलावामुळे पिकाला फटका बसला; परंतु नंतरच्या काळात केळीला पोषक वातावरण तयार झाल्याने केळीचे पीक जोमदार आले.
एका केळीच्या घडाचे वजन २८ किलो भरत आहे. आजच्या बाजारभावाने अंदाजे ८ लाख रुपये नफा मिळेल, अशी अपेक्षा नारायण वाघ यांनी व्यक्त केली .





