पुणे जिल्हा : आवटे महाविद्यालयाने घेतली संयुक्त प्रवेश परीक्षा

मंचर – मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी उपलब्ध होण्याकरिता सामान्य प्रवेश परीक्षा,राष्ट्रीय प्रवेश सह पात्रता परीक्षा, संयुक्त प्रवेश परीक्षा यासारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.अशी माहिती प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नियमित सराव परीक्षा,डायनॅमिक प्रवेश परीक्षा कामगिरी सुधारणा आणि संशोधन (सीइटी,एनइइटी, डीइइपीइआर, जेइइ) सारख्या परीक्षांचे नियोजन करण्यात येते.विद्यार्थ्यांचा परीक्षेसाठी सराव व्हावा व त्यांना भविष्यात चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात या विचारातून अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे भारतीय भौतिकशास्त्र शिक्षक संघटना (आयएपीटी) संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय मानक परीक्षा- २०२४ ही परीक्षा घेण्यात आली.
परीक्षेसाठी भौतिकशास्त्र विषयकरिता ६२, रसायनशास्त्र विषयकरिता ५९ तर जीवशास्त्र विषयकरिता २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. संबंधित परीक्षा पार पाडण्यासाठी सरिता गांजवे, कल्याणी मोरे,रोहिणी जाधव, प्राजक्ता चौधरी, आशिष गव्हाणे, खंडू खिलारी व तुषार पाटील यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
या परीक्षेसाठी डॉ.श्रद्धा महाकाळ यांचे मोलाचे तांत्रिक सहकार्य लाभले. परीक्षाप्रमुख म्हणून डॉ.उमेश पाटील यांनी कामकाज पाहिले. यासाठी त्यांना महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र मेचकर,उपप्राचार्य प्रकाश कणसे व प्राचार्य डॉ. एन.एस.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.





