Pune district : खर्चिक अहवाल टाळून साधेपणाचा आदर्श ठेवावा

अमित बेनके; वल्लभ पतसंस्थेच्या सर्व सभासदांना यावर्षी १५% लाभांश दिला जाणार आहे.
जुन्नर – जुन्नर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी त्यांच्या वार्षिक सभांसाठी महागडे आणि रंगीत अहवाल छापण्याऐवजी साधेपणाचा अवलंब करावा, असे आवाहन जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके यांनी केले आहे. जे सभासद सभेला उपस्थित राहतील, त्यांना फक्त चार पानांचा साधा अहवाल द्यावा आणि इतरांच्या माहितीसाठी महत्त्वाच्या ठिकाणी फ्लेक्सवर सूचनापत्र लावावे तसेच अहवाल पीडीएफ स्वरूपात सभासदांना त्यांच्या व्हाॅट्सॅपवर पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली. वल्लभ पतसंस्थेच्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी वल्लभ पतसंस्थेने शासनाकडे पाठपुरावा करून व्याजासह टीडीएसची रक्कम परत आणल्याचे उदाहरण दिले, जे इतर पतसंस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल. या सभेला फेडरेशनचे उपाध्यक्ष गुलाब नेहरकर, अशोक गांधी, सतीश परदेशी, चंद्रशेखर जोशी यांसह वल्लभ पतसंस्थेच्या अध्यक्ष उज्वला शेवाळे, उपाध्यक्ष बिहारीलाल परदेशी आणि इतर संचालक, सल्लागार, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अशोक गांधी यांनी वल्लभ पतसंस्थेचे कामकाज आदर्श असल्याचे सांगितले. पतसंस्थेने २६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून, थकबाकीचे प्रमाण केवळ १% आहे. जुन्या थकबाकीच्या प्रकरणांमध्ये मूळ रक्कम आणि व्याज घेऊन ती प्रकरणे निकाली काढण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी संस्थेच्या आदर्श कर्मचारी म्हणून राजेंद्र पानसरे आणि उत्कृष्ट दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून जितेंद्र परदेशी व दिलीप परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. सभासदांनी नवीन शाखा उघडणे, स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेणे, गरजू महिला व तरुणांना व्यवसाय कर्ज देणे अशा विविध सूचना मांडल्या. सभेचे सूत्रसंचालन विलास कडलक आणि संजय ढेकणे यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र परदेशी यांनी अहवाल वाचन केले. बिहारीलाल परदेशी यांनी आभार मानले.
तालुका पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, ओतूर आणि बेल्हे असे पाच विभाग तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात मासिक बैठक घेण्याचे नियोजन आहे. सुमारे २०० पतसंस्था असलेल्या जुन्नर तालुक्यात लवकरच संचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली जाईल. तसेच, सहकार उपविधी नियमांतील बदलांवर चर्चासत्र आयोजित करण्याचेही नियोजन आहे.
– गुलाब नेहरकर,जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष
१९८९ मध्ये स्थापन झालेल्या वल्लभ पतसंस्थेच्या सध्या जुन्नरमध्ये दोन शाखा कार्यरत आहेत आणि लवकरच बनकरफाटा येथे नवीन शाखा सुरू होणार आहे. ८६०० सभासद असलेल्या या संस्थेत ३२ कोटींच्या ठेवी असून, सोने तारण देणारी ही राज्यात प्रथम क्रमांकाची संस्था आहे. यावर्षी सभासदांना १५% लाभांश दिला जाणार आहे. संस्थेला ‘अ’ दर्जाचे ऑडिट मिळाले असून, सर्व कामकाज संगणकीकृत आहे.
– उज्वला शेवाळे, अध्यक्ष वल्लभ पतसंस्था





