वाघोली – दौंड येथील कला केंद्रावर झालेल्या गोळीबार प्रकरणी शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके व त्यांचा भाऊ अनंता कटके यांचा संबंध असल्याची सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून उरुळी कांचन, रांजणगाव, लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातही कार्यकर्त्यांनी तक्रार केल्या आहेत. दौंड येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदाराचा भाऊ असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्यावर याचा संबंध शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके व त्यांचे बंधू अनंता कटके यांच्याशी जोडण्यात आला व याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर विरोधकांकडून करण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाशी काहीही संबंध नसताना नाव जोडले गेल्याने अनंता कटके यांनी वाघोली पोलीस ठाण्यात रविकांत वर्पे, अनिल जगताप, विकास लवांडे, महादेव बालगुडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. शिरूर-हवेलीतील कार्यकर्त्यांनी देखील विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. याप्रकरणात दुसर्याच आमदाराचे व त्यांच्या बंधूंचे नाव समोर आले आहे. आमदार माऊली कटके यांच्यासह माझी बदनामी करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला आहे. याप्रकरणी तक्रार केली असून 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. अशा प्रकारे कोणीही बदनामी केली नाही पाहिजे. -अनंता कटके, आमदार कटके यांचे बंधू