पुणे जिल्हा : आशांसह गट प्रवर्तकांचा बेमुदत संपाला पाठिंबा

भोर – राज्यातील आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप जाहीर केला असून, भोर तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक सर्व कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार असल्याची माहिती कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक कॉ. निलेश दातखिळे व संघटक सचिव कॉ. विठ्ठल करंजे यांनी दिली.
या बेमुदत संपाबाबत माहिती देताना कॉ. करंजे म्हणाले, भोर तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत काम करणाऱ्या 8 प्रवर्तक व 148 स्वयंसेविका आहेत, तर राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत 70 हजार आशा स्वयंसेविका व 4 हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. राज्यातील आशा व गटप्रवर्तक मागणीची सोडवणूक होण्यासाठी स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, ऑनलाइन कामे करण्यासाठी होत असलेली सक्ती (दडपशाही) त्वरित थांबवावी, दिवाळी बोनस देण्यात यावा, त्यांना किमान वेतन लागू करावे,केंद्र शासनाचा मोबदला वाढवून द्यावा,
गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा, त्यांना प्रवास खर्च वेगळा द्यावा, गटपवर्तकांना ऑनलाइन कामे देऊ नये या मागण्यांसाठी आंदोलने झाली. संबंधितांकडून आश्वासने मिळाली पण कार्यवाही झाली नाही. उलट दडपणशाही वाढली असून, राज्यकृती समितीने 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचे निवेदन भोर कृती समितीने भोरचे तालुका समूह संघटक अनिल बढे आणि आरोग्य प्रशासनाला दिले आहे.
यावेळी लक्ष्मी बुदगुडे, कविता अलगुडे, आश्विनी गुरव, सोनाली खाटपे, सुरेखा मस्के, मनीषा डाळ, संगीता मांढरे, सीमा मालुसरे , तसेच आशा सेविका राजश्री गिरे, सविता भूमकर, सविता निकम, रेखा वरखडे, मुक्ता अहिरे, कल्पना आवाळे, सुरेखा वरखडे, वर्षा ढमाळ, सुजाता प्रधान, रूपाली हिंगे यांसह आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते.





