पुणे जिल्हा : ग्रामीण भागातील कलाकार झळकले मोठ्या पडद्यावर

राज्यातील चित्रपटगृहात भुंडीस प्रदर्शित
माळेगाव : गावगाड्यातील कलाकार वेबसिरीजच्या माध्यमातून मोबाइलद्वारे यु ट्यूबचे माध्यम वापरून आपल्या अभिनयच्या करामती दाखविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या अभिनयची दखल चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तसेच लेखकांनी घेतली आहे.
याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावच्या कलाकारांचे देता येईल. सध्या यु ट्यूबला सर्वात लोकप्रिय असलेली चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचे देता येईल. वेबसिरीजचे मुख्य कलाकार भरत शिंदे ऊर्फ बाळासाहेब, रामभाऊ जगताप, सुभाष मदने, यशराज डिंबळे, कुमार पाटोळे, माणिक काळे या ग्रामीण कलाकारांच्या कसदार अभिनयाने समाजातील वास्तव चित्र दाखविण्याचे काम भुंडीस चित्रपटाद्वारे केल्याचे मत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी व्यक्त केले.
पुणे येथे ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ चित्रपट (दि.१७) मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्याप्रसंगी त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी अभिनेता यशराज डिंबळे, चांडाळ चौकडीच्या करामती फेम भरत शिंदे ऊर्फ बाळासाहेब, रामभाऊ जगताप, सुभाष मदने, सुरेखा गव्हाणे, माणिक काळे, कुमार पाटोळे, अश्विन तांबे, अनुष्का बेनके, अविनाश कीर्ती, शीतल आदमाणे, श्रीकृष्ण भिंगारे, काका शिरोळे आदी कलाकारांनी हजेरी लावली होती.
लेखक सोमनाथ तांबे सांगतात की, हा सिनेमा लिहीत असताना लहानपणापासून जे अनुभवले, जे सोसले ते शब्दरुपी या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भुंडीस’ चित्रपट फक्त करमणुकीसाठी नसून या सिनेमात अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत असून नक्कीच प्रत्येकाला ते प्रश्न स्वत:चे वाटतील.
निर्माते दत्ता बापूराव दळवी म्हणाले की, ‘भुंडीस’चित्रपटाचे कथानक हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्यांच्या मुलासाठीचा संघर्ष दाखविला आहे. ही कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.





