Pune District : आदल्या दिवशीच आखाड पार्टी

पूर्व हवेलीत हजारो किलो मटण, चिकन, मासळी फस्त
लोणी काळभोर – शुक्रवारी सुरू होणार्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची अमावस्या यंदा बुधवारीच साजरी करण्यात आली. त्यामुळे पूर्व हवेली तालुक्यात आज हजारो नागरिकांनी सामिष भोजनाचा आनंद घेत गटारी अमावस्या जल्लोषात साजरी केली.
आषाढातील मांसाहाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी घरीच मित्रमंडळींसह चिकन, मटण आणि मासळीचा आस्वाद घेतला. बाजारात सकाळपासूनच खवय्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. नेहमी दुपारी गजबजणारी मटण-चिकन दुकाने यंदा सकाळी लवकरच उघडली गेली. काही दुकानांबाहेर तर रांगा लागल्या होत्या.
मांसाहारी खाणार्यांची गर्दी लक्षात घेता विक्रेत्यांनीही भरपूर स्टॉक ठेवला होता. चिकनला किलोमागे 240 रुपये, तर बोल्हाई परिसरात मटणाला 780 रुपये किलो भाव होता, अशी माहिती विक्रेते रियाज इनामदार यांनी दिली. गावरान कोंबड्यांनाही विशेष मागणी होती. घरी जेवण तयार न करणार्यांनी परिसरातील लोकप्रिय हॉटेल्समध्ये सामिष मेजवानीचा आस्वाद घेतला.
काही ठिकाणी तर जागा मिळवण्यासाठी ग्राहकांनी प्रतीक्षा करावी लागली. गटारी अमावस्येच्या निमित्ताने पूर्व हवेली तालुक्यात मांसाहारी पदार्थांची खवय्यांनी अक्षरशः लज्जत घेतली. आता एक महिन्याच्या उपासाअनंतरच पुन्हा अशा सामिष जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे, असे काहींनी सांगितले.
मासळीच्या दुकानांतही चांगली उलाढाल झाली. रोहू, कटला, सुरमई अशा प्रकारांना विशेष मागणी होती. मर्यादित मासेमारी असूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. यंदा मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे.
-नितीन शिंदे, मासळी व्यापारी





