पुणे जिल्हा : माळीण, इरशाळवाडीप्रमाणे दुर्घटनेची वाट पाहाताय का?

आमदार संग्राम थोपटे यांचा सरकारला सवाल
भोर, मुळशीतील गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी
पौड – भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली तसेच मुळशी तालुक्यातील घुटके ही तीन गावांवर मागील दोन वर्षांपासून डोंगरावरील जमिनीला पडलेल्या भेगांमुळे तसेच पावसामुळे या गावाना भूस्खलनाचा धोका आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी दोन वर्षांपासून प्रलंबित असताना पुणे जिल्ह्यातील माळीणसारखी दुर्घटना घडल्यानंतरच आपण गांभीर्याने घेणार का ? असा सवाल काँग्रेसचे भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (दि. 2) पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.
ते म्हणाले, या संदर्भातला प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. या गावांचे पुनर्वसन संदर्भात बऱ्याच वेळा सरकारकडे मागणी केली. परंतु हा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही.
मध्यंतरी रायगड तालुक्यातील इरशाळवाडी असेल किंवा पुणे जिल्ह्यातील माळीणची दुर्घटना असेल, या घटना ताज्या आहेत. शासन या घटना घडल्यानंतर लक्ष देणार आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. दुर्गम भाग असल्याने माझ्या मतदार संघातील नागरिक भयभीत आहे.
पावसाळा आला की तहसीलदार किंवा शासकीय यंत्रणा त्यांना शेजारच्या गावात मदत केंद्रात पुनर्स्थापित करते आणि पाऊस संपल्यानंतर परत त्या नागरिकांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न होतो. याकरिता माळीणच्या धरतीवर या गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी शासनाने पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेला तातडीने मंजुरी द्यावी. अशी आग्रही लक्षवेधी मागणी मांडत आमदार थोपटे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.





