पुणे जिल्हा : नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

केंद्रीयमंत्री गडकरी यांचे आभार – डॉ. अमोल कोल्हे
शेलपिंपळगाव – नाशिक फाटा ते चांडोली या 30 कि.मी. लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या 7827 कोटी रुपयांच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
चाकणची वाहतूक कोंडी हा अतिशय गंभीर व चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा करीत होते. सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात त्यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीने या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी असा आग्रह धरला होता.
त्यावेळी लवकरच मंजुरी देण्याचे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवारी (दि. 2) केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते चांडोली या 30 कि.मी. लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या 7827 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहेच, पण त्याचबरोबर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतर चाकणसह या महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे याचे विशेष समाधान आहे.
आता तांत्रिक बाबींची लवकरात लवकर पूर्तता करुन या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू व्हावे यासाठी प्रत्येक मी टप्प्यावर पाठपुरावा करणार असून मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.





