पुणे जिल्हा : अनुष्काने दिले बुडणाऱ्या तरूणाला जीवदान

मांडवगण फराटा येथील घटना : गावकऱ्यांतर्फे सत्कार
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शेलारवाडी येथील गोपीनाथ शेलार हे पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह पाण्यात पडले. खोल पाण्यात गेल्याने ते वाहत जाऊ लागले. मात्र, तिथे असलली विद्यार्थीनी अनुष्का धनंजय फराटे हिने धाडस दाखवत पाण्यात उतरून वाहत असलेली मोटारसायकल एका हाताने व एका हाताने शेलार यांना धरून पाण्याच्या बाहेर काढले. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून तिचा सत्कार करण्यात आला.
मांडवगण फराटा परिसरात पावसाने परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाड्या- वास्त्यावर जाणारे मार्ग काही काळ बंदच होते. मांडवगण ते कोळगाव मार्गावरील इनामदार वस्तीकडे जाणारा ओढा असून त्यावर नवीन पुलाचे काम सुरु आहे. बाजूने मोठे खड्डे खोदले आहेत. त्याच ओढ्याला पूर आलेला होता. पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावर नळ्या टाकून वाहतूक सुरु होती. याच धोकादायक ठिकाणी ही घटना घडली.
अनुष्का ही छत्रपती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन संभाजी फराटे यांची नात आहे. तिला लहानपणीच वडील धनंजय फराटे व चुलते मनोहर फराटे यांनी सायकलिंग, पोहणे, सर्व क्रीडा स्पर्धात तरबेज केल्यामुळे तिने हे धाडसी कार्य केले आहे. सत्कारप्रसंगी सरपंच समीक्षा कुरूमकर -फराटे, उपसरपंच अमोल शितोळे, चेअरमन संभाजी फराटे, ग्रामविकास अधिकारी आर. के. बांदल, पांडुरंग मोरे, बाळासाहेब चौधरी, शंकर फराटे, अशोक जगताप, प्रतिभा बोत्रे, मनीषा मेहेर, अर्चना चकोर, जयश्री थोरात, भाग्यश्री चोथे, उषा मस्तुद, शोभा वेदपाठक, गोरख शितोळे, वैभव फराटे, मनोहर फराटे, मोहन फराटे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.





