पुणे जिल्हा : रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग सलाईनवर

– भोर तालुक्यात जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
– रिक्त पदे तातडीने भरावीत; पशु पालकांची मागणी
भुजंगराव दाभाडे
भोर – भोर तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन विभागाच्या मंजूर असलेले सहायक पशुधन विकास अधिकारी पद १ व पशुधन पर्यवेक्षक १२ पदे, अशी १३ पैकी १३ पदे रिक्त आहेत. सध्या पशुधन विकास अधिकारी ही दोनच पदे कार्यरत आहेत. राज्य पशुसंवर्धन विभागाची १५ पैकी तब्बल १३ पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे अतिरिक्त भार दिला असला तरी तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती आणि पशुधनाच्या संख्येचा विचार करता ही रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भोर तालुक्यातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आहे.
रिक्तपदांमुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत असून मॉन्सूनपूर्व लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. पावसाळी काळात आजारी जनावरांवर औषधोपचार कसे करावे. हा मोठा प्रश्न भोर तालुक्यातील पशुधन मालकांना पडला आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे. तालुक्यात राज्य पशुसंवर्धन विभागाचे १५ व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे ११ दवाखाने कार्यरत आहेत.
दोन्ही विभाग मिळून सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक मिळून एकूण ३३ पदे मंजूर आहेत. पैकी राज्य शासनाची १३ व जिल्हा परिषदेची ३, अशी १६ पदे रिक्त आहेत. तर मंजूर २५ शिपायांपैकी १३ पदे रिक्त आहेत. तालुका लघु पशू चिकित्सालय भोर अंतर्गत येणाऱ्या भोर, राजगड, पुरंदरमधील मंजूर असणाऱ्या २५ पदांपैकी पशुधन विकास अधिकारी ही दोन पदे कार्यरत आहेत.
पशुंवर उपचार करणे अवघड
तालुक्यात विसाव्या पशुगणनेनुसार गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या कोंबड्या मिळून ४२ हजार ६१७ एवढे पशुधन आहे. या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी असलेल्या अपुऱ्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या ताणामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. पशुविकास अधिकारी, पर्यवेक्षक नसल्याने पशुधनावर वेळेत उपचार होत नाहीत.पाऊस काळात जनावरांमध्ये आजाराचे प्रमाणही जादाच असते. आता गुरांसह अन्य पशूवर वेळेवर उपचार मिळणे अवघड झाले असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पशुधनाची बिल्ला मारून नोंद अनिवार्य
भोर तालुक्यातील सर्व पशुधन पालकांनी आपल्या सर्व पशुधनास कानातील बिल्ला मारून त्याची नोंद आपल्या कार्यक्षेत्रातील दवाखान्यातील डॉक्टरांकडून भारत पशुधन अँपवर करणे अनिवार्य आहे, असे भोरच्या पशुधन विकास अधिकारी डाॅ. वर्षाराणी जाधव यांनी सांगितले.
*भोर तालुक्यातील पशुधन (२०२० च्या गणनेनुसार)
पक्षी वर्ग – १२,८८३
गाय वर्ग – १२,१४०
म्हैस वर्ग – ८,९९०
शेळी- ४८८४
मेंढी ३,७२०
…………….
एकूण – ४२,६१७
शासनाकडून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसांत पदे भरली जातील. सध्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार जिल्हा परिषदेच्या पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
– डाँ.शुभांगी गांवकरे, अतिरिक्त सहा.आयुक्त.
पशुसंवर्धन विभाग रिक्त असलेली पदे
सहायक आयुक्त एक, पशुधन विकास अधिकारी पद भरलेली आहेत. सहा.पशुधन विकास अधिकारी १ पद रिक्त आहे.पशुधन पर्यवेक्षक पदाची १२ ही पदे रिक्त आहेत.शिपाई पदे १२ मंजूर आहेत त्यातील ८ पदे रिक्त आहेत, अशी माहिती अतिरिक्त सहायक आयुक्त डॉ. शुभांगी गावकरे यांनी दिली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी पदाची ५ ही पदे रिक्त आहेत. सहा. पशुधन विकास अधिकारी,पदाचे १ पद मंजूर असून ते भरलेले आहे.पशुधन पर्यवेक्षकांचे ११ मंजूर पदांपैकी २ पदे रिक्त आहेत.तर शिपाई पदाच्या १० पैकी ६ जागा रिक्त आहेत.
डॉ. वर्षाराणी जाधव, पशुधन विकास अधिकारी, भोर





