पुणे जिल्हा : उघडी फ्यूज पेटी मृत्यूला निमंत्रण

चिंबळी-आळंदी रस्त्यावरील स्थिती : वेली, झाडांमध्ये गुंतली पेटी
चिंबळी – खेड तालुक्यातील चिंबळी-आळंदी रस्त्यावरील महाविरतणच्या रोहीत्रांवरील उघडी फ्यूज पेटी मृत्यूला निमंत्रण देत आहे. तसेच फ्यूजपेटीसह विजेच्या खांबावर वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्यामध्ये गुंतलेल्या विद्युत तारा, उघड्या डीपी बॉक्समुळेही अपघाताची शक्यता वाढली आहे. यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांचे जाळे ग्रामीण भागातील दुर्गम गावखेड्यापर्यंत पसरले आहे. त्यांची नेहमी देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र महाविरतण कंपनीतील अधिकारी- कर्मचार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामीण भागात उघड्या डीपी व लोंबकळणार्या तारा धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र दिसत आहे.
शॉटसर्किची शक्यता
पावसाळ्यापूर्वी महाविरतणने ज्या ठिकाणी विजतारा, खांब, डीपी यांना झाडाच्या फांद्या लागत असतील अशी झाडे, वेली छाटण्याचे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, महाविरतणच्या दुर्लक्षामुळे आता एका तारेचा प्रवाह दुसर्या तारेत जाऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.





