पुणे जिल्हा : पारगावात बहरला झेंडूचा महासागर

12 एकर 20 गुंठ्यावर 70 हजार रोपांची लागवड
पारगाव – पारगाव (ता. दौंड) येथील कृषी पदवीधारक शेतकऱ्याने झेंडूची 12 एकर 20 गुंठे क्षेत्रात लागवड केली असून, नवरात्रीमध्ये हा झेंडू भाव खाणार असून, कोटींच्या घरात याचे अर्थकारण फिरणार आहे. पारगाव येथील शेतकरी सर्जेराव शिवाजीराव जेधे यांनी त्यांच्या शेतात 70 हजार झेंडू रोपांची लागवड केली असून, त्यांच्या शेतात झेंडूचा महासागर बहरला आहे. या शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या औषध फवारण्या चालू असून, 35 मजूर येथे राबत आहेत. ही झेंडूची फुले पुणे, नागपूर, मुंबई, हैद्राबाद, म्हैसूर, बडोदा,बेळगाव आदी ठिकाणी पाठवण्याचे नियोजन केले आहे.
जेधे यांनी टेनिसबॉल जातीची सहा एकर रोपांची निवड केली आहे, अष्टगंधा या वाणाची तीन एकर आणि बंगलोर ऑरेंज या वाणाची तीन एकर 20 गुंठे अशी लागवड केली आहे. आतापर्यंत 27 ते 28 लाख रुपये खर्च आला असून, किलोला 80 ते शंभरी पार करेल असा विश्वास आहे. साडेतीन महिन्यात साडेबारा एकर क्षेत्रात 200 टन फुलांचे नियोजन असून, दसरा आणि दिवाळीत प्रत्येकी दहा टन फुले तोडण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी 70 ते 80 मजुरांची व्यवस्था करावी लागणार आहे.
मशागत
नांगरट करून खतांचा भेसळ डोस तयार करून साडेपाच फुटांचे बेड तयार करण्यात आले व त्यावर रोपे लावण्यात आली. या बेडमुळे पावसाळ्यात जास्त पाण्याचा फटका रोपांना बसत नाही. पॉवर टिलरने मशागत करून पूर्ण माती मोकळी करून पुन्हा खतांचा दुसरा डोस देऊन मजुरांकडून फावड्याने माती लावून घेतली, यामुळे वाऱ्या पासून झाडांचे संरक्षण होते.
मधमाश्यांचे संगोपन
झेंडूमुळे जमिनीचा पोत सुधारतो व वाळवी, उन्नी जमिनीमधून कमी होतात. मधमाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. या मधमाश्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहचू नये म्हणून जैविक औषधांचा वापर केला जात आहे. यासाठी नेटाफिम या कंपनीचे 20 एम एमचे ड्रीप सिंचन योजना केली असून त्यासाठी एकरी 90 हजार रुपये खर्च आला आहे.
खते
या झेंडू पिकासाठी 18:46, 10:26:26, 14:35:14, गंधक, स्वतंत्र पोटॅश, निंबोळी पेंड, मायक्रो न्यूट्रन्स, मॅग्नेशियम सल्फेट, असा भेसळ डोस हा रोपे लावण्याअगोदर एक व रोपे मोठी झाल्यावर एक असा दोन वेळा देण्यात आला आहे.





