Pune Distric: रुग्णवाहिका चालकाच्या कुटुंबाला’ टपाल जीवन विम्याचा’ आधार

लोणी धामणी : धामणी (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक विष्णूपंत विधाटे यांचा मुलगा कार्तिक विधाटे (वय १९) याचे नऊ महिन्यापूर्वी हृदयविकाराने निधन झाले. निधनानंतर १४ व्या दिवशी त्याच्या चुलतीचेही हृदय विकाराने निधन झाले.
विधाटे परिवारात कार्तिक हा एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबाचा आधार संपला होता. मात्र धामणी पोस्टात टपाल विमा योजने अंतर्गत काढलेल्या विम्याचा त्यांना आधार झाला.
धामणी पोस्ट ऑफिसचे पोस्ट ऑफिसर निलेश कुंभार,सुधाकर जाधव, ज्ञानेश्वर विधाटे यांच्या प्रयत्नातून ५ लक्ष ४८ हजार रुपये रकमेचा विमा मंजूर झाला आहे. या पैशाने या परिवारातील निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही.
परंतु थोडासा का होईना हातभार या कुटुंबाला लागणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये मदतीचा धनादेश स्वीकारताना कार्तिकच्या आठवणीने आईवडिलांचे डोळे पाणावले होते. या प्रसंगी पोस्ट ऑफिसर निलेश कुंभार, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच अक्षय विधाटे, अमोल जाधव, सुधाकर जाधव उपस्थित होते.





