पुणे जिल्हा : अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील सर्व उमेदवार पराभूत

खेडच्या उबाठा गटाचे बाबाजी काळेंनाच फक्त लॉटरी
शिक्रापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या सोबत राहून महायुतीच्या विरोधात अनेक सभा घेत रान पेटवणाऱ्या आणि महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार पराभूत झाले. फक्त खेड आळंदीतील महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे बाबाजी काळे यांनाच फक्त विजयाची लॉटरी लागली आहे.
महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार यांच्यासोबत राहिलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीची बाजू नेहमी मांडत राहिले. लोकसभा निवडणुकीदरम्यान फक्त शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार सोबत असताना पाच ठिकाणचे आमदार विरोधात असताना त्यांनी मोठी लढत देत पुन्हा खासदारकी खेचून आणली.
यावेळी अशोक पवार हे किंगमेकर ठरले, दरम्यान विधानसभा निवडणुका जाहीर होताच डॉ. अमोल कोल्हे यांना स्टार प्रचारक करण्यात आले असता अमोल कोल्हे यांनी यांनी महाविकास आघाडीसाठी राज्यभर एकशे चाळीसहून अधिक सभा घेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला होता.
पराभूतांची यादी मोठी
नुकतेच विधानसभेचे निकाल जाहीर झाले असताना खासदार डॉ. कोल्हे यांच्या लोकसभा मतदारसंघात हडपसर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे, जुन्नर येथे अपक्ष शरद सोनवणे, भोसरी येथे भाजपाचे महेश लांडगे, शिरुर- हवेली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे माऊली कटके, आंबेगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले असून फक्त खेड आळंदी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाबाजी काळे विजयी झाले असल्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील सर्व जागा पराभूत झाल्याचे दिसून आले आहे.





