Pune District : दौंड शहरात विठ्ठल नामाचा गजर

पंचक्रोशीतील पालख्यांचे उत्साहात स्वागत
दौंड – दौंड शहर आज पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने न्हालं. पंचक्रोशीतील विविध गावांमधून ग्रामदैवतांच्या पालख्या हरिनामाच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाच्या उधळणीत दौंड शहरात दाखल झाल्या. “विठ्ठल-विठ्ठल”च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
गावोगावच्या पालख्या शहरात दाखल झाल्या. कुरकुंभ येथील फिरंगाई माता, पांढरेवाडी, कौठडी, मेरगळवाडी, गिरीम, जिरेगाव, मळद गावांतील भैरवनाथ, माळवाडी व मसनरवाडीचे म्हसोबा, भोळोबावाडीचा भोळोबा, येडेवाडी व शिरसूफळ येथील ग्रामदैवतांच्या पालख्या भक्तांसह शहरात दाखल झाल्या.
भाविकांसाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार लक्षणीय होता. शहरातील विविध सामाजिक संघटना, दलित संघटना, शिवस्मारक समिती, तसेच ‘दौंड मंडप-डेकोरेशन-साऊंड’ संघटनेच्या वतीने पालखीतील भक्तांसाठी खिचडी व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दौंड नगर परिषदेनेही त्यांच्यावतीने स्वागतात सहभाग घेतला.
ग्रामदैवतांची विठ्ठल मंदिराला भेट
१४ गावांच्या ग्रामदैवतांच्या पालख्या आणि दौंडच्या ग्रामदैवत भैरवनाथाची पालखी अखेर विठ्ठल मंदिरात दाखल झाली. तेथे विठ्ठलाच्या सान्निध्यात क्षेम आलिंगन देत भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात पालख्या विसावल्या.
सामाजिक सलोख्याचे दर्शन
स्वागतासाठी सर्वधर्मभावप्रमाणे सर्व समाज एकत्र आला होता. दौंडच्या परंपरेप्रमाणे गावचे पाटील, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे आणि मल्हार जगदाळे यांच्या हस्ते पालख्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया यांनी मुस्लिम बांधवांसह एकात्मतेचे दर्शन घडवत पालख्यांचे स्वागत केले.





