Pune District : आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी अलंकापुरी प्रतिष्ठानची रुग्णवहिका

आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अलंकापुरी प्रतिष्ठान, आळंदी देवाची यांच्यातर्फे गेल्या १७ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या मोफत रुग्णवाहिका आणि औषध उपचार सेवेचा शुभारंभ आज संपन्न झाला. या प्रसंगी माऊली संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, ॲड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार आणि पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले.
या सोहळ्यास डॉ. चौधरी, डॉ. मंगेश, अध्यक्ष किरण येळवंडे, राम गिलबिले, सोमनाथ डवरी, नाना कातकडे, शिरीष कारेकर, संजू काळे, तुकाराम माने, विश्वनाथ नेटके, संकेत वाघमारे, शंकर येळवंडे, संदीप महाराज लोहार, संतोष महाराज शास्त्री यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हा सोहळा आळंदीतील पवित्र वातावरणात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
१७ वर्षांची अविरत सेवा परंपरा –
अलंकापुरी प्रतिष्ठान गेल्या १७ वर्षांपासून आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी मोफत रुग्णवाहिका आणि औषध उपचार सेवा पुरवत आहे. या सेवेमुळे लाखो वारकऱ्यांना पायी वारीदरम्यान आरोग्य सुविधांचा लाभ मिळाला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होऊन अनेकांचे प्राण वाचले आहेत. यंदाही ही सेवा आळंदी ते पंढरपूर या प्रमुख मार्गांवर प्रत्येक टप्प्यावर उपलब्ध राहणार आहे.





