Pune District :वाहतूककोंडीमुळे आळंदीकर घायकुतीला

पुणे-नाशिक महामार्गाऐवजी जवळचा मार्ग म्हणून आळंदीला पसंती
आळंदी – रखडलेले रस्ता रुंदीकरण, बेशिस्त वाहनचालक, अवजड वाहनांची लक्षणीय वाढ आणि मनमानी करणार्या बस, रिक्षाचालकांमुळे आळंदीत प्रवेश करण्यापूर्वीच देहूफाटा चौकात वाहतूक कोंडी दुपारी चार ते रात्री नऊच्या दरम्यान नित्याचीच असते. पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी पाहता पुण्याहून ये-जा करणार्यांनाही आता आळंदीतून जवळचा मार्ग वाटू लागला. यामुळे आळंदीत वाहनांची कोंडी होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांलगत आणि मरकळ, धानोरे, चाकण, भोसरी, शिक्रापूर औद्योगिक भागाशी जोडलेले शहर म्हणून आळंदीची ओळख आहे. आळंदी परिसरात बांधकाम क्षेत्रही विकसित झाल्याने मनुष्यबळ वाढले. परिणामी गाड्यांची संख्या वाढली.
देवदर्शनाबरोबरच लग्नासाठी आलेल्या लोकांची गर्दी तसेच शनिवार, रविवार, गुरुवारी, एकादशीला विशेष असल्याने वाहतूक नित्याची ठरलेली आहे. अवजड वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने शहरातील अरुंद रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. देहूफाटा येथून पिंपरी-चिंचवड, देहू भागातून मुंबईकडे जाण्यासाठी सोयीचा रस्ता आहे.
तसेच पुण्याकडे जाण्याचा मार्ग असल्याने देहूफाटा चौकात सतत वाहतूक कोंडी होते. शहरात अवजड वाहने सोडल्याने वारंवार कोंडी होते. भैरवनाथ चौक ते वडगाव रस्ता प्रदक्षिणा मार्ग, पुणे-आळंदी रस्त्यावर विश्रामगृह ते वाय जंक्शन, देहू फाटा ते एमआयटी महाविद्यालय, आळंदी मरकळ रस्ता या रस्त्यावर कायमच वाहतूककोंडी असते.
वाहतूक कोंडीच्या समस्येची कारणे
* देहूफाटा-काळेवाडी ते वाय जंक्शन रखडलेले रस्ता रुंदीकरण-देहूफाटा ते एमआयटी महाविद्यालय परिसरात रस्त्याच्याकडेला असलेले हातगाड्यांचे अतिक्रमण
* वाय जंक्शन येथील व्यापार्यांकडे खरेदीसाठी आलेले ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात तसेच बेशिस्त वाहनचालक
* आळंदी शहराला चक्राकार मार्ग नसल्याने अवजड वाहनांना शहराबाहेरून जाण्यासाठी याच मार्गाने जावे लागते
* प्रवाशांना घेताना चालक बस रस्त्यावरच उभी करतात
पुणे-आळंदी रस्त्यावर अडचण ठरणारे विजेचे खांब गेल्या महिन्यात काढल्याने पुण्याकडून जाणारी वाहतूक सुरळीत आहे. आता देहू बाजूला अडथळा ठरणारे विद्युत खांब काढण्याचे काम पुढील काही दिवसांत केले जाईल. मात्र, नवीन जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी साधारण 60 लाखांचा निधी आवश्यक आहे.
– माधव खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, आळंदी





