Pune District : अजितदादांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी पर्वणी

खासदार सुनेत्रा पवार यांची भावना
सासवड – अजितदादांचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी असते. त्यांच्या नेतृत्वाखाली गरिबांचे कल्याण आणि शेतकर्यांचे हित साधले जाते. आजचा उपक्रम हेच दर्शवतो. राष्ट्रवादी पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून हे माझे कुटुंब आहे, असे मत खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भवन येथे भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकरी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, महिला भजनी मंडळ यांच्यासाठी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते 50% सवलतीत औषध फवारणी बॅटरी पंप व मिल्किंग मशीन, तसेच अंगणवाडी, आशा व समुदाय संसाधन व्यक्तींना भेटवस्तू, आणि महिला भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. यावेळी व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, माजी आमदार संभाजी कुंजीर, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, दत्ता झुरंगे, विराज काकडे, गणेश जगताप, धोंडीबा कटके, ईश्वर बागमार, रामभाऊ झेंडे, रेवती कुंजीर, नाना सस्ते, गोरख मांढरे, ऋतुजा धुमाळ, गणेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमित झेंडे यांनी केले होते.
खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या, शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी अनेक योजना अजितदादांनी सुरू केल्या आहेत. आजचा हा वाटप कार्यक्रम त्यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचा एक भाग आहे. दादांच्या सामाजिक भानातून साकारलेली ही मदतीची संधी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, वाढदिवसानिमित्त साजरा झालेला हा उपक्रम लोकांच्या मनात समाधान आणि विश्वास निर्माण करणारा ठरला.
अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. त्याचबरोबर अजित पवार यांचा स्वभाव हा स्पष्ट वक्ता म्हणून आहे तर एखादे काम होणार असेल लगेच सांगतात. कोणत्याही जातीपातीचे राजकारण करीत नाहीत. लाडकी बहीणसारखी योजना अजित दादांच्या नेतृत्वाखाली चालू आहे.
-प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक





