पुणे जिल्हा : कण्हेरी गावातील शेती पाण्याखाली

शिवसृष्टीतून बाहेर सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतपिकांचे नुकासान
काटेवाडी – दोन ते तीन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कण्हेरी येथील शिवसृष्टीतून आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे अनेक शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
कण्हेरी (ता. बारामती) या ठिकाणी साधारण 25 एकरामध्ये शिवसृष्टीचे काम सुरू आहे. या शिवसृष्टीच्या आतील भागातून पावसाचे पाणी बाहेर येण्यासाठी जमिनीतून पाइप काढून ते पाइप रस्त्याच्या बाहेर काढण्यात आले आहेत. या पाइपची साइज साधारण एक ते दोन फूट असल्याने या पाइपांमधून संपूर्ण 25 एकरातील सृष्टीतील पाणी बाहेर येत असल्याने येथील शेतकर्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतातील संपूर्ण पीक पाण्याखाली गाडले गेले आहे यामुळे या शेतकर्यांचे पीक तर पूर्णपणे नष्ट झालेले आहे.
शिवसृष्टीतून पावसाचे पाणी आल्यामुळे रस्ता व जमीन खरवडून गेली आहे. शिवसृष्टीही चढावरती असल्याने जे पावसाचे पाणी शिवसृष्टीच्या बाहेर पाइपमधून काढले आहे त्या पाइपलाइनच्या खालील बाजूस शेतकर्यांची शेती आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणात हे नुकसान शेतकर्यांचे झाले आहे.
शिवसृष्टीतील पावसाच्या पाण्यामुळे कण्हेरी येथील शेतकरी नाना देवकाते, शंकर देवकाते, भगवान देवकाते, दादासो देवकाते, तात्यासाहेब देवकाते, मारुती कचरे, दादासो खरात, अशोक खरात, भागवत खरात यांच्या जमिनी आहेत. या सर्व शेतकर्यांचे या पाण्यामुळे नुकसान झाले असल्याने या शेतकर्यांनी मागणी केली आहे की शिवसृष्टीतील पावसाचे पाणी ज्या पाईपने बाहेर काढले आहे त्या पाइपपासून पुढे पाइपलाइन करून हे पाणी नीरा डाव्या कालव्यामध्ये सोडण्यात आले तर या सर्व शेतकर्यांचे या पाण्यामुळे होणारे नुकसान थांबणार आहे.





