Pune : लोकअदालतीत पुणे जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला. दाखल एकूण प्रकारणांपैकी सुमारे ८७ हजार ४८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर ३६६ कोटींहून अधिक रकमेची तडजोड रक्कम जमा करण्यात आली.
विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांचे हस्ते लोकअदालतचे उद्धाटन पार पडले. याप्रसंगी न्यायालयातील अशोक हॉल येथे विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.के. महाजन म्हणाले, “लोकअदालत सर्वांसाठी जलद न्याय, सुलभता आणि न्याय विवाद निराकरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.’ यावेळी १ लाख ८७ हजार ६३ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ८७ हजार ४८६ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.
लोकअदालतीमध्ये दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश मिळाले. एकूण ५२ कोटी ३ लाख २७ हजार रकमेची तडजोड झाली आहे. यामध्ये दाखल पूर्व (प्रि-लिटिगेशन) १ लाख ४५ हजार १७९ प्रकरणे तडजोडीची दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ५१ हजार ३२८ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. याशिवाय एकूण दाखल दाव्यात (पोस्ट लिटिगेशन) ३१४ कोटी २४ लाख ५८ हजार ५०२ तडजोड रक्कम प्राप्त झाली.
यामध्ये एकूण ४१ हजार ८८४ प्रकरणे तडजोसाठी हाती घेण्यात आली होती . तर त्यापैकी ३६ हजार १५८ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. लोक अदालतीचे सूत्रसंचलन गौरीका पाटील यांनी, तर आभार न्यायाधीश डी. जे. पाटील यांनी मानले.





