पुणे जिल्हा : तुळशी विवाहानंतर आता लग्नसराई सुरू होणार

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 70 शुभमुहूर्त
लोणी काळभोर – तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होत असून इच्छुक वधू-वरांच्या लग्नाचे बार उडणार असून जून 2025पर्यंत जवळपास 70 मुहूर्त आहेत. 13 नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला असून या लग्नसराईच्या हंगामातील पहिला विवाह मुहूर्त रविवारी 17 नोव्हेंबर रोजी आहे.
यावर्षी गुढीपाडव्यापर्यंत एकूण 44 शुभमुहूर्त असल्याने विवाह इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. दिवाळी सणाची सांगता ही खरी तुळशीच्या लग्नाने होत असते. 13 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाने लग्नसराईला प्रारंभ झाला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सर्वच समारंभांना उत्सवाचे स्वरुप आल्याने लग्नसराईत धूमधडाक्यात लग्नांचे बार उडणार आहेत. यंदाच्या लग्न सराईमध्ये गुढीपाडव्यापर्यंत एकूण 44 तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 70 शुभमुहूर्त असल्याने यंदा कर्तव्य असलेल्या अनेक विवाह इच्छुकांना दोनाचे चार हात करण्याची संधी मिळणार आहे. लग्नसराईचा हंगाम नोव्हेंबर ते जून अखेरपर्यंत असून या हंगामातील पहिला शुभमुहूर्त 17 नोव्हेंबर तर 8 जून हा अखेरचा शुभमुहूर्त आहे.
चांगला शुभमुहूर्त गाठून लग्नाचा बार उडवून टाकायचाच अशी खूणगाठ मनाशी बाधून अनेक विवाह इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. वधू-वर माता-पित्यांची सोयरीक जुळवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. दिवाळीतील नातलगांच्या भेटीगाठीमध्ये स्थळ दाखवण्याचा कार्यक्रमही होत असून दिवाळीच्या सुट्टीत एकत्र आल्याने फराळ व विचारांच्या देवाण – घेवाणी बरोबरच स्थळांचीही देवाण घेवाण होत आहे. ज्यांचे विवाह आधीच जमलेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांकडून मंगल कार्यालयांच्या बुकींगला वेग आला आहे.
पंचागांतील मार्गदर्शनानुसार शुभमुहूर्तासह काढीव तिथी सुचवल्या जात आहेत. लग्नसराई सुरु होत असल्याने यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांचाही हंगाम सुरु होणार आहे. लग्न सोहळ्यांमध्ये हौसेसाठी वारेमाप खर्च केला जात असल्याने या व्यावसायिकांचा हंगामही बहरणार आहे. या लग्नसराईत सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी 14 शुभमुहूर्त डिसेंबर व मे महिन्यात असून, जून महिन्यात सर्वात कमी 5 मुहूर्त आहेत. तर नोव्हेंबर व जानेवारी महिन्यात 6, फेब्रुवारी मध्ये 11, मार्चमध्ये 8, एप्रिलमध्ये 7 मुहूर्त आहेत.
नोव्हेंबरमध्ये 17, डिसेंबरमध्ये 15 व 22, जानेवारीमध्ये 19, 26, फेब्रुवारी 16, 23, मार्च 2, एप्रिलमध्ये 20, जून मध्ये 8 या तारखांना रविवार येत असल्याने अनेकांनी या तारखांना कार्यालय बुकिंगसाठी कार्यालय मालकांकडे आग्रह धरलेला आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने अनेक वधू – वरांचा हिरमोड झाला असून राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते लग्नाला उपस्थित राहू शकत नसल्याने अनेक लग्नांची तारीख देखील बदलण्यात आली आहे.





