पुणे जिल्हा : अत्याचाराच्या घटनेनंतर ‘झेडपी’ ऍक्टिव्ह

दर पाच वर्षांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी
पुणे – भिगवण (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनने या प्रकारास पायबंद घालण्यासाठी नियमावली प्रसिद्ध करीत, त्यानुसार कार्यवाही करण्याच्या आदेश दिले आहेत. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रत्येक पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी करण्याबरोबर शाळा परिसरात सीसीटीव्ही बसविणे, दर्शनी भागात हेल्पलाइन नंबर लावणे, तक्रार पेटी ठेवणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शाळांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेतील काही शिक्षक शाळेत असभ्य वर्तुणक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेने कठोर पाऊले उचलली आहेत. सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरण निर्मितीसाठी शिक्षक व मुख्याध्यापकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलीस शारिरिक व मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर वेळेत कार्यवाही होणे आवश्यक आहे, असेही आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.
दर्शनी भागात ही माहिती लावा
लैगिंक अत्याचाराबाबत वरिष्ठ कार्यालयास थेट तक्रार करण्यासाठी शाळेच्या सूचनाफलकावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा ई-मेल लिहावा. चिराग ऍप आणि पास्को कायद्याविषयी सर्व माहिती सूचनाफलकावर लावावीत. यावर तत्कार नोंदविण्यासाठी विशेष किशोर पोलीस पथक अथवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावीत. कायदेविषयक पोस्टर्स लावावेत. चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक, पोलीस सुरक्षा क्रमांक, महिला सुरक्षा नंबर व तत्काळ सेवाची माहिती दर्शनी भागात लावावीत.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जनजागृती करण्याच्या हेतूने नियमावलीची पुन्हा एकदा अंमलबजाणी करण्यात येत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये शाळेने पीडित विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद





