पुणे जिल्हा : बारामतीनंतर सर्वात जास्त निधी इंदापूरकरांना

रूपालीताई चाकणकर : महिलांना आवलंबन अजितदादा मुळे विसरू नका
अतुल व्यवहारे यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
इंदापूर – संत शिरोमणी सावता महाराज यांनी समाजात भक्ती मांडली, तसे आमदार दत्तात्रय भरणे जे समाजासाठी काम करतात. त्याच कामात माझा देव आहे. भक्ती आहे, त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीनंतर सर्वात जास्त निधी कोणाला दिला असेल तर तो इंदापूरकरांना, साडेसहा हजार कोटी दिला असे गौरवोद्गार आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी काढले.
इंदापूर शहरातील संत सावता माळी मंदिर सावता माळीनगर येथे रविवारी (दि. 10) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) या पक्षात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल नानासाहेब व्यवहारे यांनी शेकडो समर्थकांसह जाहीर पक्षप्रवेश चाकणकर यांच्या हस्ते व इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला.
चाकणकर म्हणाल्या, राज्यात चांगल्या पद्धतीचे रस्ते इंदापूर तालुक्यात झाले. त्यामुळेच लोक मला सांगतात.
कोणतेही गावाला जा, वाड्यावर, वस्त्यावर जा असे चकाचक रस्ते दिसतील. हे फक्त झालं ते मामांच्या विकासकामांमुळे, इंदापूर तालुक्यात 1 लाख 5 हजार महिला भगिनींना थेट सरकारकडून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात. ही राजकारणाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. या योजनेला कोणीही मध्यस्थी नाही, बर्याच महिलांचे जोडखाते होते. मात्र स्वतंत्र खाते या योजनेमुळे झाले. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे. विरोधकांना जनतेसमोर जाताना काही कामे नाहीत, योजना नाहीत. त्यामुळे टीका करतात याकडे लक्ष देऊ नका.
दत्तात्रय भरणे म्हणाले, शासनाने लाडक्या बहिणींसाठी, शेतकर्यांच्या हितासाठी, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी, अभिनव योजना आणल्या. यामुळेच महिलांची तरुणांची युवकांची प्रगती झाली. गॅस सिलेंडर वर्षाला तीन फ्री देऊन गरीब कुटुंबाचे कल्याण सरकारने साधले आहे. युवक नेते अतुल व्यवहारे यांनी योग्यवेळी निर्णय, घेतल्यामुळे, तालुक्याच्या हिताच्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अतुल व्यवहारे यांना ताकद दिली जाईल. अशी ही ग्वाही उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आपण शिरसवडीचा पूल काही दिवसांपूर्वी मंजूर केला. हा पूल झाल्यानंतर, इंदापूर शहरातील मार्केटला किती चांगले दिवस येणार आहेत. किती मोठा विकासात्मक बदल होईल. या गोष्टीचे विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे होते, मात्र या होणार्या पुलावर टीका केली हे बरोबर नाही .
-दत्तात्रय भरणे, आमदार इंदापूर





